सिकंदर अनवारे ।दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रीव्ही कंपनीला गुरुवारी लागलेल्या आगीची धग शुक्रवारी सायंकाळपर्यंतही कायम होती. आगीने औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक क्षेत्राशी संबंधित शासकीय विभाग, सरकारच्या उद्योगवाढीच्या धोरणामुळे कठोर कारवाई करत नसल्याने सातत्याने अशा घटना समोर येत आहेत.महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही आॅर्गनिक इंडिया लि. कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणताना स्थानिक प्रशासन आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र, ही यंत्रणा अपुरी पडल्याने अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलास या वेळी पाचारण करण्यात आले. आगीचे रौद्ररूप लक्षात घेऊन लगतच्या गावांतील ग्रामस्थांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या परिसरात पोलिसांकडून तत्काळ प्रवेशबंदी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. शिवाय मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढल्याने अफवांचे पेव फुटले.आगीवर नियंत्रणासाठी कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित एक आराखडा तयार करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न केल्याने कंपनीबाहेर ठेवलेल्या रसायनांनीही पेट घेतला. आग विझवताना फोम मारणे अपेक्षित असताना पाणी मारले जात होते. अखेर इतर ठिकाणाहून आलेल्या अग्निशमन यंत्रणांनी फोमचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रीव्ही कंपनीच्या शेजारी देव्हाड्रिल, ओंकार केमिकल, लासा असे छोटे-मोठे प्लांट आहेत. या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा वापरूनही आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले असते.प्रीव्ही कंपनीतील आगीमुळे एमआयडीसी क्षेत्रातील कुचकामी सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सरकारकडून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, या क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था सक्षम आहे की नाहीत, याबाबत पाहणी करत नाहीत किंवा नसल्यास कठोर कारवाई करीत नाहीत. महाडमध्ये अनेक कारखान्यांत अशा घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, कारवाईचा केवळ दिखावा करून सोडण्यात येत असल्याने कंपन्या पुन्हा जैसे थे सुरू राहतात.महाडमधील प्रदीप शेट्टे या कारखान्यात आतापर्यंत दोन मोठे अपघात झाले आहेत. यात मनुष्यहानीही झाली आहे. मात्र, हा कारखाना आजही सुरू आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात अनेक भंगार गोदामे आहेत. दोन वर्षांपूर्वी एका भंगार गोदामात वायुगळती होऊन चार जण ठार झाले होते. तर गतवर्षी एका भंगार गोदामाला टेमघर गावात आग लागली होती. मात्र, आजही ही गोदामे सुरूच आहेत. या क्षेत्राशी संबंधित शासकीय विभाग कठोर कारवाई करीत नसल्याने वारंवार अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. अनेक कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. इमारतींचे आॅडिट होते की नाही, हा प्रश्न आहे. मात्र, कामगार-अधिकारीदेखील याबाबत कोणतीच ठोस भूमिका या ठिकाणी घेताना दिसत नाहीत. यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेले कारखाने तशाच स्थितीत सुरू आहेत. प्रीव्ही कंपनीच्या बाहेर उभी असलेली अनेक वाहने खाक झाली आहे. यात चार ट्रक आणि शेकडो दुचाकी वाहने आहेत. या वाहनांची नुकसानभरपाई इन्शुरन्स कंपनीकडून देण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. ज्या दुचाकींचा इन्शुरन्स नसेल अशा दुचाकीना नुकसानभरपाई मिळेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना या वाहनाचा पूर्ण मोबदला मिळाला नाही तर त्यांचे वैयक्तिकरीत्या मोठे नुकसानच होणार आहे.प्रीव्ही कंपनीतील आगीची माहिती सर्वत्र पसरतच गेली, यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. आग आटोक्यात येत नाही, हे लक्षात येताच पंकज गिरी यांनी निरीक्षण करून कंपनीच्या दुसऱ्या बाजूने धाव घेतली. या ठिकाणी समोरील बाजूला आलेले मातीच्या गाड्या आणि पाण्याच्या गाड्या मागील बाजूस घेऊन गेले. गटारे बुझवणे आणि पाण्याचा मारा करणे सुरू केला. काही क्षणातच आगीवर नियंत्रण आले आणि अग्निशमन दलाच्या गाड्या कारखान्यात आत गेल्या.यामुळे कंपनीचा हायड्रोजन प्लांट वाचवणे प्रशासनाला शक्य झाले. गिरी यांनी या वेळी दाखविलेली समयसूचकता आग आटोक्यात आणण्यास मोलाची ठरली. हायड्रोजन प्लांट वाचल्याने अनेकांचे जीवन वाचवल्याची भावना उपस्थित व्यक्त करीत होते.प्रीव्ही कंपनीबाहेरील रसायन उचलणारप्रीव्ही कंपनी ही सुगंधी द्रव्य बनवणारी कंपनी आहे. जवळपास तीन युनिट येथे काम करत आहेत. दोन नंबरमधील कंपनीत लागलेल्या आगीत शेकडो लिटर रासायनिक द्रव्य बाहेर पडले.या द्रव्याने आग तर पसरलीच, शिवाय आगीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. काळ्या धुराने शेजारील गावे व्यापली होती. तर आजदेखील कंपनी समोरील गटारे या घातक रासायनिक द्रव्याने भरली आहेत. हे द्रव्य पुन्हा उचलून कंपनीच्या ई.टी.पी. प्लांटमध्ये प्रक्रिया करून पुन्हा हे सांडपाणी महाड सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणले जाईल. या सर्वांचा अहवाल महाड प्रदूषण मंडळाला द्यावयाचा आहे, अशी माहिती प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी दिनेश वसावा यांनी दिली.
कंपनीतील आगीची धग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:27 AM