रायगडमध्ये युतीला आघाडीचे तगडे आव्हान; भवितव्यासाठी १६ जण रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 05:29 AM2019-04-22T05:29:08+5:302019-04-22T05:29:45+5:30
शेतकरी कामगार पक्षाने युतीऐवजी आघाडीला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या रायगडमधील लढतीचे चित्र बदलले आहे.
अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाने युतीऐवजी आघाडीला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याने यंदाच्या रायगडमधील लढतीचे चित्र बदलले आहे. प्रचाराची रणधुमाळी संपेपर्यंत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाल्याने युतीतर्फे लढत देणारे शिवसेनेचे अनंत गीते आणि आघाडीतर्फे रिंगणात असलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील लढत यावेळी प्रचंड चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
युती-आघाडीतील मातब्बर नेत्यांच्या प्रचारसभांनी गजबजलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी थंडावला. मंगळवारी, २३ ला येथे मतदान पार पडेल. त्यामुळे रायगडचा ‘राजा’ कोण? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने, गेले २० दिवस रायगड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. गीते हे हॅट्ट्रिक साधण्यासाठी, तर तटकरे हे मागील पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत. परंतु मतदारराजा नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो? हे निकालाअंती स्पष्ट होईल. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेरच्या दिवशी उमेदवारांच्या काही प्रमुख सभा वगळता काही ठिकाणी रॅली पार पडल्या आणि उन्हाच्या झळा सोसत सायंकाळी प्रचाराची सांगता झाली.
छुप्या प्रचाराला वेग?
नियमानुसार प्रचार थांबला असला, तरी आता खºया अर्थाने छुप्या
प्रचाराला जोर येण्याची चिन्हे आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता बाहेर पडतील. मतदारांचे मन आणि मतपरिवर्तन करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले कार्यकर्ते कामाला लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.