शेती कर्जासाठी रोकड उपलब्ध करावी
By admin | Published: December 28, 2016 03:55 AM2016-12-28T03:55:51+5:302016-12-28T03:55:51+5:30
शेतकरी खातेदाराला कर्ज वितरित करता यावे यासाठी नोटाबंदीनंतर नोटांची कमतरता असली तरी रायगड जिल्हा सहकारी बँकेला त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणात भारतीय
अलिबाग : शेतकरी खातेदाराला कर्ज वितरित करता यावे यासाठी नोटाबंदीनंतर नोटांची कमतरता असली तरी रायगड जिल्हा सहकारी बँकेला त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणात भारतीय स्टेट बँकेने रोकड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले बोलत होत्या. जिल्ह्यातील बँकांनी त्यांना दिलेले शेती पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे अशा सूचना देवून जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आर्थिक वर्षाअखेरपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. बँकेने कॅशलेस करण्यासाठी निवडलेल्या गावात ग्रामसभेला उपस्थित राहून कॅशलेस व्यवहारासंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्याचे काम करावे. तसेच बँकेने स्वतंत्रपणे शिबिरे आयोजित करु न जनजागृती करावी, तरच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जनतेकडून प्रतिसाद मिळेल व कॅशलेस गावे करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी के ल्या.
या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक सी.कार्तिक, बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीशकुमार सिंग, लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुधाकर रगतवान, रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नाबार्डने तयार केलेल्या संभाव्यतायुक्त ऋ ण योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
(विशेष प्रतिनिधी)
बँक खाती आधार कार्डाशी जोडा
- निवृत्तिवेतनधारकांची बँक खाती आधार कार्डाशी जोडण्याचे काम येत्या १५ जानेवारी २०१७ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिल्या. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत
- राष्ट्रीयकृत बँकांनी ९३ टक्के, खाजगी बँकांनी ७४ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ६४ टक्के, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९२ टक्के असे सर्व बँकांनी मिळून ९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती लिड बँकेचे व्यवस्थापक टी.मधुसूदन यांनी दिली.