मधूकर ठाकूर, उरण: मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद ४ ऑगस्ट रोजी जेएनपीए बंदराला (पूर्वीचे JNPT) भेट देणार आहेत. दोन तासांच्या भेटीसाठी येणाऱ्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी जेएनपीए प्रशासन आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याची बंदोबस्तासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. गुरुवारी, ४ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता राष्ट्रपती जेएनपीए बंदराला भेट देणार आहेत.
जेएनपीए बंदराच्या कामकाजाची त्यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. या भेटीत जेएनपीएचा विकास, योजना, व्यापार वृध्दी यावर चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी जेएनपीए व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहिती जेएनपीएच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. जेएनपीएच्या भेटीवर येणाऱ्या मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद यांच्या बंदोबस्तासाठी न्हावा- शेवा बंदर पोलीस ठाण्यानेही बंदोबस्तासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बंदोबस्तासाठी डीसीपी-१, एसीपी-३, पोलिस निरीक्षक -१३, एपीआय- ३८, कर्मचारी -२२३ असा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.