पनवेलच्या शहरी भागात कुपोषणाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:59 PM2019-12-10T23:59:49+5:302019-12-10T23:59:53+5:30
करंजाडे नोड नव्याने विकसित होत आहे.
- वैभव गायकर
पनवेल : करंजाडे नोडलगतच्या वडघर आदिवासीवाडीतील वंदना पवार या आठ वर्षांच्या मुलीचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेनंतर पनवेलसारख्या स्मार्ट शहरातही कुपोषणाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. वडघर आदिवासीवाडीलगत असलेल्या करंजाडे नोडमधील सेक्टर ६ मधील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत पाच मध्यम स्वरूपाची कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
करंजाडे नोड नव्याने विकसित होत आहे. पनवेल शहर व सिडको वसाहतीला लागूनच असलेल्या करंजाडे आदिवासीवाडीत कुपोषित बालके आढळली आहेत. पनवेल तालुक्यात ६६ कुपोषित बालके असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मात्र, हा आकडा वास्तववादी नसल्याचे दिसून येत आहे. सरकारी यंत्रणा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कृती आराखडा तयार करीत असली तरी शहरी कुपोषणाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेत तालुक्यातील ११ आदिवासीवाड्यांचा समावेश आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात एकही बालक कुपोषणग्रस्त नसल्याचा दावा पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांमार्फत कुपोषण निर्मूलनावर काम केले जात असून पोषण आहार योजना राबविली जात आहे.
शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषण स्थितीबद्दल मासिक अहवाल एकात्मिक बालविकास योजना प्रकल्पाकडे दिला जातो. या अहवालात कुपोषित बालकांची संख्या, बालमृत्यूची संख्या, उपलब्ध मनुष्यबळ याची माहिती दिली जाते. ग्रामीण भागात माता-बालक पोषणासाठी यंत्रणा आहे. मात्र, शहरी भागात गरीब गर्भवती स्त्रिया आणि कुपोषित मुले यांच्या नोंदीच होत नाहीत. आरोग्य तपासणीचीही बोंब असते. शहरी भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वाढत असून कुपोषित बालकांची संख्याही मोठी आहे. संबंधित बालकांची नोंद अंगणवाडीत केली जात नसल्याने कुपोषणाची आकडेवारी समोर येत नाही.
कुपोषणाची लक्षणे
च्पनवेलमधील एकात्मिक बालविकास अधिकारी चेतन गायकवाड यांच्याकडे कुपोषणासंदर्भात विचारणा केली असता, पनवेल तालुक्याची दोन गटांत विभागणी झाली आहे. च्पनवेल १ विभागात सध्याच्या घडीला ३८ मध्यम स्वरूपाच्या कुपोषित बालकांचा समावेश असल्याचे सांगितले. यामध्ये आपटे, गव्हाण, काळुंद्रे, भिंगार या विभागाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रशिक्षणात असल्याचे सांगून पुढील माहिती देण्याचे टाळले.
कुपोषणाची कारणे
च्अंगावरील दूध पाजणे लवकर बंद करणे, बाळाचा आहार कमी झाल्यावर आणि बाळ सारखे आजारी पडत असेल तर कुपोषणाचे कारण असू शकते, जन्मत: बाळाचे वजन कमी असेल, दोन मुलांमध्ये कमी अंतर असणे.
वर्षभरात तीन बालकांचा मृत्यू
पनवेल विभागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पामध्ये नेरे, वावंजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ मध्यम कुपोषित बालकांचा समावेश आहे. वर्षभरात तीन बालकांचा मृत्यू कुपोषणाने झाल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती गांधी यांनी दिली.