अलिबाग : माणसाला माणसाशी माणुसकीनं वागायला आणि माणूसपण जपायला शिकवतं ते खरं साहित्य. साहित्याला जात नसते. साहित्यिकाने जातीपलीकडे जाऊन माणूसपण जपण्याकरिता साहित्यनिर्मिती करावी. माणसाला जरी जन्माने जात चिकटली असली तरी साहित्याला जात नसते. साहित्यिक कोणत्याही जातीचा असला तरी त्याने माणूसपण जपण्याकरिता निर्माण केलेले साहित्य हे नेहमीच आनंद देणारे आणि उद्बोधक असते. जातीच्या चौकटीत न अडकता साहित्यिकांनी सर्जनशीलता जपली पाहिजे. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. त्यात माणूसपणाचे स्वच्छ प्रतिबिंब उमटले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे यांनी केले.अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील भ. ल. पाटील साहित्य व सामाजिक संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार भ. ल. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी पोयनाडमधील गणेश मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात कवयित्री सहस्रबुद्धे यांना ‘भ. ल. पाटील काव्यभूषण पुरस्कार’ संस्थेचे मुख्य सल्लागार तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुरामभाऊ पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त कोलाड येथील सुएसो शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक अजय पाटील होते; तर विशेष अतिथी म्हणून कामार्ले ग्रामपंचायतीचे सरपंच संदीपभाऊ वाघपंजे उपस्थित होते. या वेळी प्रा. चंद्रकांत मढवी यांना ‘कादंबरी भूषण’, कवी पुंडलिक म्हात्रे यांना ‘काव्यभूषण पुरस्कार’ व मोहन भोईर यांना ‘नाट्यभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कामार्ले ग्रामपंचायत उभारणार समाज भवन कामार्ले ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप वाघपंजे यांनी, कामार्ले ग्रामपंचायत लवकरच भ. ल. पाटील यांच्या नावाने, समाज भवनाची निर्मिती करेल, एक महान नाटककार ग्रामपंचायत हद्दीमध्ये निर्माण झाला. याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक माणसाच्या उत्कर्षासाठी व त्याला प्रेरणा मिळावी, त्याच्या हातून सत्कार्य घडावे, यासाठी पुरस्कार वितरणासारखे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत अजय पाटील यांनी या वेळी मांडले. पुरस्कार प्राप्त कवी पुंडलिक म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
माणूस जपणाऱ्या साहित्याला जात नसते
By admin | Published: October 09, 2016 2:52 AM