उद्घाटनाअगोदरच मानिवली शाळेच्या इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:42 AM2019-09-04T00:42:00+5:302019-09-04T00:42:05+5:30

३६ लाख रुपये खर्च : बांधलेल्या इमारतीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप; प्रशासनाचे दुर्लक्ष

Manavali school building leaked just before the inauguration | उद्घाटनाअगोदरच मानिवली शाळेच्या इमारतीला गळती

उद्घाटनाअगोदरच मानिवली शाळेच्या इमारतीला गळती

Next

कांता हाबळे 

नेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. ३६ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटनाअगोदरच या शाळा इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या काही वर्गखोल्यांमध्ये पाणी पडत आहे. एवढा मोठा निधी मिळूनसुद्धा या दुमजली शाळा इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे.

मानिवली गावात २००५-०६ च्या दरम्यान तीन वर्गखोल्या असलेली षट्कोनी शाळा बांधण्यात आली होती. येथे इयत्ता आठवीपर्यंत शाळा असून येथे वर्गखोल्या कमी पडत असल्याने जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांच्या प्रयत्नाने मानिवली येथे जिल्हा परिषद शाळेच्या पाच वर्गखोल्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे ३६ लाख रुपये मंजूर झाल्यानंतर या इमारत बांधणीचे काम सुरू करण्यात आले होते. ही इमारत घाईघाईत सहा वर्ग खोल्यांची पूर्ण झाली आहे; परंतु पहिल्याच पावसात या इमारतीला गळती लागली आहे.
विशेष म्हणजे, अद्याप या शाळा इमारतीचे उद्घाटनही झाले नाही. असे असताना या इमारतीत वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असून, स्लॅबमधून पाणी वर्गखोल्यांमध्ये पडत असून भिंतीदेखील ओल्या झाल्या आहेत. ही इमारत निकृष्ट दर्जाची झाली असतानादेखील शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील शिक्षक, मुख्यापकांनी पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषदेला कळवले नाही. याबाबत पालक तसेच ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच मानिवली जिल्हा परिषदेच्या षट्कोनी शाळेच्या इमारतीलाही गळती लागली असून त्यावर प्लॅस्टिक टाकले आहे. या शाळेत इयत्ता आठवीपर्यंत १२१ विद्यार्थी आहेत, तर यासाठी तीन इमारती आहेत, नव्याने बांधलेल्या सहा वर्गखोल्या, षट्कोनी इमारतीत तीन वर्गखोल्या तसेच गावात दोन वर्गखोल्या, अशा आठवीपर्यंत एकूण ११ वर्गखोल्या तयार झाल्या आहेत.

शाळेच्या पटांगणाला कंपाउंडही नसल्याचे वाहने शाळेच्या आवारातून ये-जा करत असतात. तसेच स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. याकडेही दुर्लक्ष झाले असल्याचे समोर आहे. तसेच या ३६ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मुख्याध्यापक, तसेच शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला का कळविले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. मानिवली शाळेला निधी मिळूनही हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांच्याशी मानिवली जिल्हा परिषदेच्या शाळा इमारती संदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मानिवली जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीत पाच वर्गखोल्या मंजूर होत्या; परंतु सहा वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. शाळेच्या छताला गळती लागली आहे. या संदर्भात तक्रारी कोणाकडेही केल्या नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीला कळविले आहे. त्यांनी शाळेच्यावर सभागृह बांधायचे ठेवले आहे. त्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
- पी. टी. राठोड, मुख्याध्यापक,
मानिवली शाळा
मानिवली जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या संदर्भात आमच्याकडे कोणत्याही प्रकारे तक्रारी आलेल्या नाहीत.
- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी,
पं. स. कर्जत

Web Title: Manavali school building leaked just before the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.