जयंत धुळप
अलिबाग - आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील जयंत बाळकृष्ण देशमुख (59), मिलींद भास्कर मोरे (46) आणि रोहीदास लक्ष्मण तांडेल (44) या तिघांच्या टोळीला रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6.45 वाजता पाली-सुधागड जवळील राबगांव येथे सापळा रुचून रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन तोंडांचे तीन मांडुळ साप जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या तीन सापांची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.हॉटेल राबगांव व्हिलेज येथे सापळा रचून अटक
रायगड जिल्हयात विविध वन्यजीव प्रजातीच्या प्राण्यांची व त्यांच्या अवयवांची विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती रायगडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. शुक्रवार 23 नोव्हेंबर रोजी तीन जण दोन तोंडीचे जीवंत मांडुळ साप विकण्यासाठी पाली(सुधागड) जवळच्या राबगांव येथील हॉटेल राबगांव व्हिलेज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून हॉटेल राबगांव व्हिलेज येथे सापळा लावण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास खबऱ्याने दिलेल्या वर्णनाप्रमाणे तीन जण हॉटेल राबगावमध्ये येताना दिसले. त्यापैकी एकाच्या हातात पिवळया रंगाची कापडी पिशवी होती. त्याचा संशय आल्याने त्यांना हॉटेल राबगाव व्हिलेजमध्ये प्रवेश करीत असताना अटकाव करून त्यांच्याकडे विचारपूस करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्या माणसाच्या हातातील पिवळया रंगाच्या पिशवीमध्ये तिन मांडुळ प्रजातीचे साप आढळून आले. काळी जादू व औषधी पदार्थ तयार करण्यासाठी मांडुळाचा उपयोग
चौकशी केली असता, त्यांनी हे सर्व साप विक्रीकरीता आणले असून त्याचा वापर हा काळी जादू व औषधी पदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याचे सांगितले. तत्काळ या तिघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध पाली पोलीस ठाण्यात वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39(3) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्याकडे पूढील तपास
मांडुळ सर्प कोठून मिळविले व यापूर्वी किती सर्पांची विदेशात आंतराराष्ट्रीय टोळीला विक्री केली याबाबत पुढील तपास जयंत बाळकृष्ण देशमुख, मिलींद भास्कर मोरे आणि रोहीदास लक्ष्मण तांडेल या आरोपींना घेऊन पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे हे करित आहेत. दरम्यात जप्त करण्यात आलेले अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजातीतील द्वीमूखी तिन मांडुळ साप सुरिक्षततेच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.