लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : पावसाळा तोंडावर आला असताना वेळेची बचत करणारा मांडवा ते गेट वे हा जलवाहतूक प्रवास आता तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असून, मेरी टाईम विभागाने या संदर्भात जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्या-येण्यासाठी आता रस्ते मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. मांडवा ते गेटवे जलवाहतूक बंद होणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का हे रो रो बोट सेवा सुरू राहणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मांडवा ते गेटवे हा जलवाहतूक प्रवास आरामदायी आणि वेळेची बचत करणारा आहे. रस्तेमार्गे मुंबई गाठायला चार तास अवधी लागतो. जलवाहतूकद्वारे हाच प्रवास एक तासाचा होतो. समुद्रमार्गे बोटीने येताना लाटांचा आनंद घेत प्रवासी प्रवास करतात. पर्यटकही जलवाहतूकद्वारेच अलिबाग गाठत असतात. त्यामुळे सर्वच प्रवाशांना जलवाहतूक ही फायदेशीर ठरत असते. पीएनपी, मालदार, अजंठा या कंपन्यांच्या बोटी प्रवाशांना जलवाहतुकीची सुविधा पुरवीत आहे.
पर्यटनावर परिणामजूनमध्ये पावसाळा सुरू होण्याआधी आठ दिवस आधी जलवाहतूक सेवा बंद केली जाते. त्यानुसार महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन वाहतूक बंद करण्याचे कळविले आहे. जलवाहतूक बंद होणार असल्याने पर्यटनावर काहीसा परिणाम जाणवणार आहे. सप्टेंबर महिन्यात जलवाहतूक सुरू होणार आहे. दरम्यान, मांडवा ते भाऊचा धक्का ही रो रो बोट सेवा सुरू राहणार आहे. मात्र, हवामानानुसार रो रोच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता तीन महिने रस्ते मार्गानेच ये-जा करावी लागणार आहे.