गणेश प्रभाळेदिघी : दिघी ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील दिघी-माणगाव रस्त्यावरील कामे पूर्ण होत आली असून, आता या वेगवान रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे दिघी - माणगाव प्रवास धोकादायक बनला आहे.
माणगाव ते दिघीदरम्यानच्या मार्गात १७ गावे रस्त्यालगत आहेत. सोबत बसस्थानके, व्यावसायिक शिक्षणसंस्था, मराठी शाळा, पदवी कॉलेज व अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ या मार्गावर कायम असते. मात्र, रस्ते सुरळीत असल्याने छोटे-मोठे अपघात हे नेहमीचे चित्र दिसते.
पुणे ते दिवेआगर व हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांतील अंतर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. श्रीवर्धन परिवहन आगारातून सुटणाऱ्या बहुतेक बस गाड्या याच मार्गावरून ये-जा करत असतात. दिघी पोर्टमधून अनेक अवजड वाहने व श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांमुळे या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.
अशातच काहींना घाईगडबडीचा प्रवास करण्याच्या बेतात महामार्गाच्या मुख्य रस्त्याला गर्दीतून वाहनांना ओव्हरटेक करण्याचे सुचते. परंतु या ५० किलोमीटर अंतरावर रस्त्याला एकही गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढावतात. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत आहे.या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने या मार्गावर गतिरोधक बसवावे. त्यामुळे अपघातांना आळा बसेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.