- अरुण जंगम म्हसळा : म्हसळा शहरात माणगाव ते दिघी रस्ता काँक्रीटीकरणाचे काम नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले. या वेळी कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यात रस्त्याची उंची व जागेचा मोबदला यावरून वाद निर्माण झाला होता; परंतु म्हसळा तहसीलदारांच्या मध्यस्थीने चर्चा केल्यानंतर, जोपर्यंत कागदी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत काम थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले.माणगाव ते दिघी या ५८ कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. दोन दिवसांपासून हे काम म्हसळा पोलीस चेकपोस्टपासून पुढे म्हसळा शहारात करण्यात येत आहे. यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. मात्र, ज्यांच्या जागेत हे काम केले गेले, यांना लेखी सोडाच; पण साधी तोंडी कल्पनाही दिली गेली नाही. तसेच या ठिकाणी टाकलेल्या मोरीमुळे रस्त्याची उंची वाढल्याने बाजूची जागा जवळ जवळ ६ फूट खोल जाणार आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी परिसरातील काम बंद पाडले. म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके व म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे या वेळी हजर होते.ग्रामस्थांचा चढलेला पारा पाहून संबंधित कंत्राटदार समोर यायला तयार नव्हता; परंतु तहसीलदारांच्या सांगण्यावरून कंत्राटदार हजर झाल्यावर ग्रामस्थांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. वाद वाढल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येताच तहसीलदार झळके यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांच्याशी ग्रामस्थांचा व बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने वाद निवळला. शुक्रवारी तहसीलदार दालनात दुपारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांना रस्त्याची उंची व जमिनीचा मोबदला या प्रश्नावरून धारेवर धरले.संपादित जागेची मोजणी प्रक्रि या तसेच हद्द कायम करण्यात आलेली नाही, त्यामुळे अजून या रस्त्यामुळे बाधित शेतकºयांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही, असे उत्तर या वेळी निफाडे यांनी दिल्याने ग्रामस्थ संतापले आणि जोपर्यंत रस्त्याची उंची योग्य करण्याचे लेखी पुरावे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून मिळत नाहीत, तोपर्यंत काम बंदच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.अजूनही जागा मोजणीचे तसेच हद्द कायम करण्याचे काम झालेले नाही. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण करू, तसेच रस्त्याच्या उंची संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून नियोजित प्लॅनमध्ये योग्य बदल करून पर्याय काढण्याचा प्रयत्न करू.- सचिन निफाडे, उप अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळमाणगाव-दिघी महामार्गावरील म्हसळ्यातील रस्त्यालगतची जागामोजणी वेगाने होण्यासाठी जातीने लक्ष घालणार. रस्ता रुं दीकरणामुळे बाधित शेतकºयांना मोबदल्यासंदर्भात श्रीवर्धन, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांचे मार्गदर्शन घेणार आहे.- रामदास झळके,तहसीलदार, म्हसळा
माणगाव-दिघी रस्ता रुंदीकरण काम अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:21 AM