माणगाव : माणगाव तालुका पंचायत समिती सभापतीचे आरक्षण १० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात एकूण १५ तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
माणगाव तालुका पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी पडलेले आहे; परंतु माणगाव पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांची एकूण संख्या आठ आहे. त्यामध्ये शिवसेनेचे पाच व राष्ट्रवादीचे तीन असे सदस्य आहेत. त्यामध्ये सभापतिपदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी पडले असून, या आठ सदस्यांमध्ये अनुसूचित जातीचा एकही सदस्य नाही, त्यामुळे या आरक्षणासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या माणगाव पंचायत समिती सभापतिपदी शिवसेनेचे सुजित दिनकर शिंदे आहेत, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या ममता मिलिंद फोंडके यांच्याकडे पदभार आहे. माणगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत सभापतिपद हे रिक्त राहणार असून, सभापतींचा प्रभारी कार्यभार म्हणून उपसभापतीकडे जाणार असल्याची माहिती माणगाव तहसील कार्यालयाकडून व माणगाव पंचायत समिती कार्यालयाकडून मिळाली आहे. जोपर्यंत आरक्षणाचा अहवाल जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे जात नाही, तोपर्यंत सभापतिपद हे सुजित शिंदे यांच्याकडेच राहणार आहे.
रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातील सभापतिपदाची निवड करण्यात येईल, त्या वेळेस माणगाव पंचायत समिती सभापतिपदी प्रभारी म्हणून उपसभापती यांच्याकडे पदभार जाईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे जनता संभ्रमात असून एकही उमेदवार अनुसूचित जातीच्या नसताना आरक्षण कसे पडले? याची जनतेमध्ये जोरदार चर्चा चालू आहे.