माणगावकरांना पाणीटंचाईची झळ, काळनदीची पातळी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:17 AM2019-05-27T00:17:00+5:302019-05-27T00:17:03+5:30
सध्या माणगावकरांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे.
- गिरीश गोरेगावकर
माणगाव : सध्या माणगावकरांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. काळनदीची पातळी खूप खोलवर गेल्याने पाणी ओढून घेणाऱ्या तीन वाहिन्यांपैकी एकच वाहिनी चालू असल्याने सध्या माणगावकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
माणगावला नवीन योजना कार्यरत केली आहे; पण तिचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. जवळपास सहा कोटी खर्चून उभारलेल्या या फिल्टरेशन प्लान्टचा उपयोग न च्या बरोबर असल्याचे आता बोलले जात आहे. आता पुढील पंधरवड्यात एकदिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आता चालू परिस्थिती गंभीर आहे. पाच लाइनला आज तर उरलेल्या पाच लाइनला उद्या, असे नियोजन करण्यात आले आहे. लोक पाणी न आल्याने पाण्याच्या टाक्यांकडे म्हणजेच जलशुद्धी केंद्रात धाव घेत आहेत, यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी हैराण झाले आहेत. या अडचणीच्या काळात ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. शहरातील नऊ ते दहा लाइनला पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाची दमछाक होत आहे. पूर्वीच्या काळी बांधण्यात आलेल्या जॅकवेल आजही वाढत्या माणगाव शहराला पाणीपुरवठा करण्यात सक्षम आहेत; परंतु वेळच्या वेळी नियोजन करणे गरजेचे आहे. जॅकवेलमधील जवळपास १५ फूट चिखलयुक्त गाळ काढण्याचे मोठे काम हाती घ्यावे लागणार आहे. अन्यथा पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. काम दोन वर्षांत एकदा तरी करणे गरजेचे आहे. हे महत्त्वाचे काम करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी शटडाउन
घ्यावा लागेल, अशी माहिती
संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.
सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याचे चिन्ह दिसत असून जलशुद्धी केंद्रात नवीन पंप, नवीन पॅनल, नवीन वायरिंग करण्यात आली आहे; परंतु आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार! अशी अवस्था झाली आहे.
>माणगाव नगरपंचायतची पाणीयोजना व्यवस्थित आहे. एकूण तीन जॅकवेल आहेत; पण या जॅकवेलमध्ये नदीतून येणाºया तीन वाहिन्यांपैकी काळनदीच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने एकाच वाहिनीस पाणी येत आहे. त्यामुळे एका वेळी एकच जॅकवेल भरत आहे. यावर उपाय म्हणून लवकरच सबमर्शियल पाइप बसवणार आहोत.
- आकाश बुवा, अभियंता, पाणीपुरवठा विभाग,
नगरपंचायत माणगाव