बोर्ली-मांडला/मुरूड : यंदा हिवाळ्यात चांगली थंडी पडल्याने आंबा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंब्याला चांगला मोहरही आला. मात्र, अचानक उन्हाचा पारा चढल्याने आंब्याचा मोहर आणि फळधारणा झालेल्या झाडांच्या कैरी गळू लागल्या आहेत, याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यात पारा ११ ते १४ अंशांपर्यंत घसरल्याने त्याचा फटका आंब्याला बसला आहे. या कालावधीतील कमाल व किमान तापमानातील फरक सरासरीपेक्षा अधिक होता. ज्या आंब्याला फळधारणा झाली आहे. त्या आंब्याच्या कैऱ्याही गळून गेल्या आहेत. सुमारे ८० टक्के फळगळ झाल्याने मार्चअखेरीस येणारे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १० टक्के मोहराला झालेल्या फळधारणेवरच बागायतदारांची धुरा आहे. एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने या वर्षीचा हंगाम कमी उत्पन्न देणारा राहील, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या सुरु वातीला पोषक वातावरण होते. त्यामुळे आंब्याला मोहरही चांगला आला. सुरु वातीच्या टप्प्यातील उत्पादन चांगले मिळाले आहे. दोनच दिवसांपूर्वी पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली. रायगड जिल्ह्यातून सुमारे २५ पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. ४ हजार ते ८ हजार रु पये पेटीला दर मिळत आहे; परंतु थंडीचा जोर जानेवारीतही कायम राहिल्याने मोठ्या प्रमाणावर मोहर आला होता.कैरी लागलेल्या ठिकाणी मोहर नव्याने आला. उन्हामुळे सुपारीएवढी झालेली कैरी गळून गेली आहे. त्यातून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळाले असते. सध्या आलेल्या मोहराचे उत्पादन एप्रिलमध्ये मिळणार आहे. मार्चमध्ये अवघे १० टक्केच उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. सध्या मार्केटमध्ये कर्नाटक, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. ती पुढे वाढतच जाईल. त्याचे आव्हान रायगडसहित कोकणातील हापूसपुढे असून दरावर त्याचा परिणाम होत असल्याचे आंबा बागायतदार शिरीष पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)गेल्या आठवड्यात तापमान वाढले आहे, त्याचा फटका आंब्याला बसला आहे. आंब्याचा मोहर आणि फळधारना झाडलेले सुपारी एवढ्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.काही ठिकाणी नवीन मोहर आहे एप्रिलमध्ये बाजारात आंबा येईल- संजय चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी
उन्हाचा पारा चढल्याने आंब्याची गळती
By admin | Published: February 18, 2017 6:32 AM