- प्रकाश कदम पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील खडकवणे-दत्तवाडी येथील महिला शेतकरी कलावती एकनाथ कदम यांनी कृषी विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १०० कलम आंबा लागवड केली आहे. यासाठी शासनाचे ३ वर्षे अनुदान देय आहे.मात्र कलावती कदम व पती एकनाथ कदम या दाम्पत्याने हा परिसर दुर्गम, डोंगराळ असतानाही अथक मेहनत व परिश्रम घेत आंबा लागवडीनंतर सुमारे एक किमी अंतरावरून हंड्याने पाणी आणून, तसेच गतवर्षी पडलेल्या पावसाचे पाणी ३ टाक्यांमध्ये साठवूनसर्वच १०० झाडे जगविण्याचा विक्रम केला आहे.तालुका कृषी विभाग यांच्याकडून, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांना विनामूल्य १०० आंबा कलमांची झाडे मिळाली. शासनाच्या निकषानुसार ०.२५ क्षेत्रात माळरानावर शेतात ३ बाय ३ आकाराचे खड्डे खोदून त्यात शेण, पालापाचोळा टाकून, ते कुजवून ५ बाय ५ मीटर अंतरावर त्यांनी लागवड केली आहे.पहिल्या वर्षी हंड्याने डोक्यावर सुमारे १ कि.मी. अंतरावरून पाणी आणून प्रत्येक दिवशी प्रति झाड १ ते २ लीटरप्रमाणे कदम यांनी पाणी दिले. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात शेतात एक प्लॅस्टिक छप्पर तयार करून पनेल लावून पावसाचे तीन टाक्यांमध्ये सुमारे १० हजार लीटर पाणी साठवले. सद्यस्थितीत प्रति झाड १ ते २ लीटर पाणी झाडांना दिले जाते, आणि वेळप्रसंगी बिसलरी कॅन भरून आणि हंड्याने पाणी आणून रोपांचे संवर्धन केले जाते.आंबा कलमांच्या लागवडीसाठी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ व कृषी सहायक दत्तात्रेय नरुटे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कदम सांगतात. सध्या वणवा लागण्याचे प्रकार परिसरात वाढले आहे. अशा वेळी रोपांच्या सुरक्षेसाठी त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागतात. त्यांनी शेतातील गवत साफ करून, आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला आहे. बाहेरील वणव्याची झळ रोपांना बसू नये म्हणून आधीच कुंपणाच्या आजूबाजूचा परिसर जाळून घेतला आहे.काम सांभाळून संवर्धनशासनाने बोअरवेल मारल्यास ठिबक सिंचनद्वारे झाडांचे संवर्धन करता येईल, अशी अपेक्षा कदम दांपत्याने व्यक्त केली आहे. कलावती या आशा सेविका असून वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे गावोगावी फिरून घर व शेतीची कामे सांभाळून झाडांची मुलांप्रमाणे काळजी घेत आहेत. तर त्यांचे पती एकनाथ दिव्यांग असूनही परिस्थितीवर मात करून पत्नीसोबत झाडांना पाणी घालणे, निगा राखणे यासाठी मेहनत घेत आहेत.
सलाम तुमच्या जिद्दीला! एक किमीवरून पाणी आणून शेतकरी महिलेनं जगवली आंब्याची कलमं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:56 PM