लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुती व इंंडिया आघाडीकडून उमेदवार घोषित केले असून, त्यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. गावोगावी बैठका, कोपरा सभा, लहान सभा होत आहेत. मात्र, यात रायगडच्या विकासावर कोणीही बोलताना दिसत नाही. एकमेकांची उणीदुणी काढण्यावर उमेदवारांचा अधिकचा भर दिसत आहे.
रायगडचा जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत विकासकामे अधिक झाली आहेत. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलिबाग, श्रीवर्धन, पेण, महाड, गुहागर, दापोली या विधानसभा मतदारसंघात अनेक विकास आजही रखडलेला आहेत. इंडिया आघाडीकडून उद्धव सेनेचे अनंत गीते, तर महायुतीकडून अजित पवार गटाचे सुनील तटकरे रिंगणात आहेत. त्याचा प्रचार मतदारसंघात सुरू आहे. नाराज असलेले मित्र पक्षही प्रचारात सहभागी होऊ लागले आहेत. अद्याप मोठ्या सभा झालेल्या नाहीत. मात्र, संवाद मेळावे, गाव बैठका, छोट्या सभांमधून प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर टीका करीत आहेत. आतापर्यंत विकासाचा एकही मुद्दा प्रचारात आलेला नाही. त्यामुळे रायगडचा विकास या निवडणुकीच्या प्रचारातून गायब झाला आहे का, असा सवाल मतदार करीत आहेत.
प्रमुख समस्याजिल्ह्यातून जाणारा मुंबई, गोवा महामार्ग आजही बारा वर्षांनंतर रखडलेला आहे. पाणी समस्या हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आरोग्याची समस्या, बेरोजगारी, रखडलेले प्रकल्प, महामार्ग, कॉरिडॉर, घटत चाललेले भातक्षेत्र, बंद पडत असलेले उद्योग, शिक्षणाचे प्रश्न, ऐतिहासिक ठेवा, पर्यटन सुविधा, विकासकामे हे मुद्दे प्रचारात उपस्थित होत नाहीत.