वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत मनुष्यबळाचा खडखडात; विभागातील मंजूर 29 पैकी 27 पदे रिक्त

By निखिल म्हात्रे | Published: March 15, 2024 12:20 PM2024-03-15T12:20:49+5:302024-03-15T12:21:47+5:30

जवळजवळ ८० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे भूजलावर अवलंबून आहेत आणि यापैकी बहुतांश स्त्रोत पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्रात आहेत.

Manpower shake-up in senior geoscientist, groundwater survey and development system; Out of 29 sanctioned posts in the department, 27 posts are vacant | वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत मनुष्यबळाचा खडखडात; विभागातील मंजूर 29 पैकी 27 पदे रिक्त

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत मनुष्यबळाचा खडखडात; विभागातील मंजूर 29 पैकी 27 पदे रिक्त

अलिबाग  - रायगड जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील मोठ्या प्रमाणातील रिक्तपदांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. कार्यालयातील मंजूर 29 पदांपैकी फक्त दोन पदे भरलेली आहेत. 27 पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची निवृत्ती, बदली व नव्याने न होणारी कर्मचारी भरती यामुळे येथे रिक्त पदांमध्ये वाढ झाली आहे.

जवळजवळ ८० टक्के पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे भूजलावर अवलंबून आहेत आणि यापैकी बहुतांश स्त्रोत पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्रात आहेत. भूजलांचा स्रोत हा अवकाश, वेळ आणि खोली यांनी निश्चित असल्याने राज्यातील भूजलावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शासनाने स्त्रोत बळकटीकरणास व शाश्वत्तेस प्राधान्य देण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

या यंत्रणेमार्फत भूजल विषयक सर्वेक्षण करणे, भूजलाचे मूल्यांकन- भूजल संवर्धन आणि जुन्या विहीरींचे पुनरुज्जीवन करणे व नवीन विहीरी खोदणे आदी कामे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फथ केली जातात. या व्यतीरिक्त भूजल अंदाजपत्रक तयार करणे, वाळूपट्टा सर्वेक्षण, नळ पाणीपुरवठा उद्भव सर्वेक्षण, विविध योजनांतर्गत सर्वेक्षण व तांत्रिक अभिप्राय देणे, जलविज्ञान प्रकल्प आणि विविध वित्तीय संस्थांमार्फत सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याकरिता भूजल उपलब्धता प्रमाणपत्र आणि तांत्रिक सल्ला देणे इत्यादी कामे करण्यात येतात. आता या यंत्रणेत कृत्रिम बुध्दिमत्तेचाही वापर होऊ लागला आहे. असे असले तरी रायगड जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चांगलाच खडखडाट आहे.

29 पदांपैकी वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि भाैगोलिक माहिती प्रणाली अधिकारी ही दोन पदे भरलेली आहेत. उर्वरित सहाय्यक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक तीनपैकी, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक अधिकारी, उपलेखापाल, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, भी.मा.प्र. सहाय्यक, सर्वेक्षक,  यांत्रिकी, सहाय्यक आवेदक, रिगमन, वाहनचालक, शिपाई, पहारेकरी आणि मदतनीस यांची पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांमुळे वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या कामांवर परिणाम होत आहे. सर्वेक्षण करणे, नकाशा तयार करणे, मासिक अहवाल तयार करणे, योजनांची अंमलबजावणी, प्लान तयार करणे आदी कामांवर आदी कामांवर परिणाम होत आहे, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता हिंगोले यांनी दिली. वर्ग तीन व चारची पदे ही विभागीय स्तरावर भरली जातात, तर अधिकारी वर्गातील पदे ही लोकसेवा आयोग व पदोन्नतीने भरली जातात. 2018 नंतर विभागातील भरती प्रक्रिया झालेली नाही, अशी माहिती हिंगोले यांनी दिली.

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संपर्ण रायगड जिल्ह्याचे कामकाज सध्या फक्त दोन कर्मचाऱ्यांवर चालू आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. कार्यालयातील रिक्तपदांबाबत वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आलेले आहे. मात्र रिक्त पदे भरली गेलेली नाहीत.
- सुजाता हिंगोले, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रायगड
 

Web Title: Manpower shake-up in senior geoscientist, groundwater survey and development system; Out of 29 sanctioned posts in the department, 27 posts are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग