- दत्ता म्हात्रेपेण : ‘गाव करील ते राव करील काय’ या उक्तीप्रमाणे रविवारी महापुरात वेढलेल्या पेणमधील कणे गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने कंबर कसली असून आपत्तीचा सामना करण्यास सज्ज झाले आहेत. खाडीतील पाण्याची पातळी कमी होताक्षणी पद्धतशीर नियोजन आराखडा करून हाती मिळेल ते साधनसामग्री घेऊन १५० ग्रामस्थ बांधावर धडकले. खाडीचा फुटलेला संरक्षक बांध बांधण्यासाठी जीवाचे रान करून आलेल्या संकटाला मागे हटविण्यात सज्ज झाले आहेत. आपत्तीच्या काळात लोकसहभाग कसा असावा, याचे कणे ग्रामस्थांनी सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. शासकीय यंत्रणेच्या मदतीची वाट न पाहता तातडीने काम हाती घेतले आहे.रविवार ते मंगळवार असे तीन दिवस पुराचे पाणी सभोवार होते. मंगळवारी रात्री समुद्रात ओहोटी लागून पाणी ओसरल्यावर ग्रामस्थांनी जिद्दीला पेटून उठत काम हाती घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापनात लोकसहभाग असल्याशिवाय काम होत नसत, हे कणे गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. गावातील पूर्व बाजूने भोगावती नदीचा प्रवाह अंतोरे गावमार्गे कणे खाडीत येऊन मिळतो. उधाण भरती व अतिवृष्टीच्या काळात खाडीकिनारी हायटाइड परिस्थिती निर्माण होऊन खाडीचे बांध ओव्हरफ्लो होऊन चिखल मातीचे असल्याने लगेच फुटतात. यावर्षी पेणमध्ये विक्रमी पाऊस पडल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूर्व व दक्षिण बाजूकडील पुराचे लोंढे आल्यावर मातीचे बांध पत्त्याप्रमाणे कोसळले. ही दयनीय अवस्था झाल्यावर ग्रामस्थांची झोप उडाली. या संरक्षक बंधाऱ्यावर गामस्थांची तब्बल ९०० एकर भातशेती अवलंबून आहे. जर फुटलेले बांध दुरुस्त न केल्यास प्रत्येक उधाण भरतीच्या वेळेस गावात पाणी तर येणारच; पण पिकती भातशेती नापीक होणार; अशा या संकटापासून वाचण्यासाठी गाव एकत्र आले आहे.पूर्वांपार चालत आलेली चावडीवरची बैठक घेऊन बांध बांधण्यासाठी नियोजन केले. बुधवारी ओहोटी असल्याने काम करण्याची संधी मिळाली. पुढील येणारी नारळी पौर्णिमेची मोठी उधाण भरती लक्षात घेऊन १५ आॅगस्टपूर्वी जागोजागी फुटलेले संरक्षक बांध बांधण्यासाठी १५० ग्रामस्थ खाडीचे बांध बंदिस्त करण्यात एकवटले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संवाद व समन्वय महत्त्वाचा आहे. यामध्ये जोपर्यंत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे व नागरिकांचा १०० टक्के सहभाग असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी ठरत नाही. पूर्वजांनी प्रगत तंत्रज्ञान विकसित नसताना एकमेकांच्या सहकार्याने या खारभूमी संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल सामुदायिक पद्धतीने केली होती आणि त्याप्रमाणे नजरेसमोर ठेवून कणे ग्रामस्थ कामात व्यस्त आहेत. १९ कि.मी. लांब खाडीचा बांध असून तो जागोजागी पूरपरिस्थितीमुळे फुटला असून येत्या १२ आॅगस्टपूर्वी बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
आपत्तीचा सामना करण्यासाठी कणे ग्रामस्थांनी कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:56 PM