मराठा क्रांती मोर्चा : रायगडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:45 AM2018-07-26T00:45:35+5:302018-07-26T00:46:26+5:30
रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूर, खोपोली, माणगाव, महाड व श्रीवर्धन येथे बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभला.
अलिबाग : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबई-कोकणासह राज्यातील सात जिल्ह्यांत बंदची हाक दिली होती. त्यास रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूर, खोपोली, माणगाव, महाड व श्रीवर्धन येथे १०० टक्के प्रतिसाद लाभला. बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या, तर दैनंदिन व्यवहार देखील संथ झाले होते. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी व्यावसायिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव दुकाने व व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले होते. अनुचित प्रकार टाळण्याकरिता जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केल्याने मुंबई-पुण्यादरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. या महामार्गावर रास्ता रोको होणार या पार्श्वभूमीवर येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
येथे व्यवहार सुरळीत
बुधवारच्या बंदला काही ठिकाणी थंड प्रतिसाद मिळाला. तेथील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. अलिबाग, दिघी, माथेरान, रोहा, रेवदंडा, म्हसळा आदी तालुक्यांचा त्यात समावेश होता.
दिघीत थंड प्रतिसाद
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात व्यवहार सुरळीत सुरू होते. बाजारपेठ, शाळा, कॉलेज, खासगी व सार्वजनिक वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती.
गैरसोय नाही
माथेरान : माथेरान हे पर्यटनस्थळ बंदपासून दूर राहिले. सर्व व्यवहार आणि दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स सुरळीत सुरू होते, त्यामुळेच पर्यटकांची गैरसोय झाली नाही.
रोह्यात शांततेत आंदोलन
धाटाव: रोहा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी शांततेत आंदोलन करण्यात आले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात रोहा तालुका मराठा समाजाच्या आयोजित बैठकीत दिवंगत अनंत मोरे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
व्यवहार सुरळीत
रेवदंडा : आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी पुकारलेल्या बंदला रेवदंडामध्ये थंड प्रतिसाद मिळाला. सर्वच दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू होते. बाजारपेठ, रिक्षा, खासगी वाहने नेहमीप्रमाणे चालू होती. बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकाशी संपर्क साधला असता, अलिबागपर्यंत बस ये-जा सुरू होती तसेच रोहा मार्गावरील शटल सेवा सुरू होती. मुंबईकडे जाणारी बस सेवा सुरू असल्याचे त्याने सांगितले.
खोपोलीसह खालापुरात जोरदार निषेध
वावोशी : बुधवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचे पडसाद शहरभर उमटले आहेत. खोपोली शहरात खालापूर तालुक्यात ठिकठिकाणी समाज बांधव रस्त्यावर उतरून निदर्शने करीत होते, तर खोपोली शहरात मोर्चा काढून राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.
शिळफाटा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय महामार्ग क्र. चार वर ठाण मांडून बसल्याने जवळपास एक तास रास्ता रोको करण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठेतून जोरदार घोषणाबाजी करीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी सर्व जाती-धर्माच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला होता.
या मेळाव्यात महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यानंतर मोर्चा भरपावसात शिळफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्याने या ठिकाणी शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन राष्ट्रीय महामार्ग चार हायवेवर ठाण मांडून रस्ता रोखून धरीत जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला.
कर्जत कडकडीत बंद
कर्जत : सकल मराठा समाजाने आज बंदची हाक दिली होती. कर्जत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी कर्जतच्या चारफाटा येथे रास्ता रोको केला. या वेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये महिला व मुलींचासुद्धा सहभाग होता. कर्जतच्या बाजारपेठेत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. काही शाळा, महाविद्यालये बंद होती तर काही लगेचच सोडून देण्यात आली. एकंदरीत बंद कडकडीत पाळण्यात आला.
कर्जत बंद करण्याबाबत कालच सकल मराठाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले होते तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी दुपारनंतर बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करायला लावली होती. बुधवारी सकाळी ९.३० वाजल्यापासूनच सकल मराठाचे कार्यकर्ते झेंडे घेऊन टिळक चौकात जमू लागले आणि ११ वाजेपर्यंत टिळक चौकात कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत कर्जत बाजारपेठेतून डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आमराई मार्गे कर्जत शहराच्या प्रवेशद्वारावरील चारफाट्यावर आले तेथेही कार्यकर्ते आधीपासूनच जमले होते. सर्व परिसर भगव्या झेंड्याने भरून गेला होता. या वेळी सकल मराठाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, एका अॅम्बुलन्सला मराठा कार्यकर्त्यांनी त्या प्रचंड गर्दीतही वाट करून दिली. तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. कर्जतचे उप विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागकुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.