पनवेल (रायगड) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांति मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक व भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी विविध समाजाचे कार्यकर्ते देखिल उपस्थित होते.
कलंबोली येथे उफाळलेल्या जनक्षोभाला केवळ भाजप नेतेच जबाबदर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरली असल्याचा आरोप रामदास शेवाळे यांनी केला. भाजपने निवडणुकांपूर्वी अनेक अश्वासने दिली. मराठा समाजाच्या तरुणावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्याने दिले आहेत. मात्र, ते आश्वासन मुख्यमंत्री पाळत नाहीत. त्यामुळे भाजप विरोधात मराठा समाजामध्ये नाराजी पसरली असल्याचेही सांगत मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.