ऐतिहासिक आंदोलनासाठी मराठा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:40 AM2017-08-09T06:40:04+5:302017-08-09T06:40:22+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पूर्वसंध्येलाच पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातून हजारो नागरिक नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शाळा,महाविद्यालयांसह एपीएमसीमध्ये आंदोलकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपºयातून येणाºया मराठा बांधवांच्या पाहुणचारासाठी शहरातील शेकडो स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून दिले असून नाष्टा, जेवणासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मोर्चासाठी रूग्णवाहिका, डॉक्टरांसह वाहन दुरूस्ती पथकही तयार केले आहे. समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन केले आहे.
‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंदोलक मुंबई, नवी मुंबईमध्ये येण्यास सुरवात झाली आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातून ७०० वाहने मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाली आहेत. सायंकाळपर्यंत हजारो नागरिक नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या सर्वांची वाहने उभी करण्यासाठी सानपाडा दत्तमंदिराजवळ विशेष वाहनतळ तयार करण्यात आला आहे. आंदोलकांसाठी मंदिर परिसरामध्ये थांबण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात भव्य मोर्चे काढण्यात आले. ९ आॅगस्टला क्रांतिदिनानिमित्त शिखर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे साक्षीदार होण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही एक दिवस अगोदरच येथे आलो असल्याची प्रतिक्रिया बीडमधून आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यातूनही हजारो नागरिक सायंकाळपर्यंत नवी मुंबईमध्ये धडकले. यामधील अनेकांनी माथाडी भवन व कांदा बटाटा मार्केटमध्ये मुक्काम केला आहे. या सर्वांच्या राहण्याची जेवण व नाष्ट्याची सोय महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.
उस्मानाबादमधून आलेल्या आंदोलकांची राहण्याची सोय तेरणा स्कूल व महाविद्यालयामध्ये केली आहे. सांगली जिल्ह्यामधूनही हजारो नागरिक मंगळवारीच उपस्थित राहिले आहेत. त्यामधील अनेकांची सोय भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये केली आहे. कोकणामधून आलेल्या अनेकांची सोय पनवेल परिसरामध्ये करण्यात आली आहे. नवी मुंबईमधील महाराष्ट्र सदनचा भूखंड, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी रेल्वे स्टेशन, सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा - बटाटा व मसाला मार्केटमध्ये वाहने उभी करण्याची सोय केली आहे. खारघरमधील सेंट्रल पार्क, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरामध्येही पार्किंगची सोय केली आहे. प्रत्येक जिल्हानिहाय सुविधा उपलब्ध करून दिली. आंदोलकांच्या मदतीसाठी नवी मुंबईमधील दोन हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत. शहरातील शेकडो युवकांनी मुंबईमध्येही स्वयंसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारली असून ते मंगळवारीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चामध्ये दिशा दाखविण्यापासून ते कचरा उचलण्यापर्यंत सर्व काम स्वेच्छेने करण्याची तयारी दर्शविली आहे.
सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
1मराठा क्रांती मूक मोर्चा शांततेमध्ये पार पडावा यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. राज्याच्या विविध भागातून मुंबईकडे मोर्चा जात असताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाणार आहे. त्याकरिता मोर्चा आयोजक, महापालिका अधिकारी यांच्यासोबत देखील पोलिसांनी समन्वय बैठक घेवून मोर्चाचा पूर्व आढावा घेतला आहे.
2त्यानुसार सायन-पनवेल मार्गावर मंगळवार रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग, चौक अशा सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे सह आयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले. राज्याच्या विविध भागातून येणाºया मोर्चेकºयांच्या वाहन पार्किंगसाठी आयोजकांनी शहरात ठिकठिकाणी पार्किंगची सोय केली आहे.
3त्या सर्व पार्किंगच्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये सर्व उपआयुक्त, सह आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक यांच्यासह सुमारे १०० अधिकारी तर ७५० हून अधिक पोलीस कर्मचाºयांचा समावेश असणार आहे. मोर्चादरम्यान शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर गर्दी वाढून वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
4यामुळे वाहतूक शाखेचे सर्वच पोलीस बंदोबस्तावर नेमण्यात आले असून, त्यांच्या मदतीकरिता मुख्यालयाचे जादा १०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मोर्चाच्या सुरवातीपासून ते मोर्चावरून परत जाईपर्यंत सायन-पनवेल मार्गावर पोलिसांकडून गस्त घातली जाणार आहे. त्याशिवाय गर्दीतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उच्च दर्जाचा कॅमेरा असलेल्या ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचेही पोलीस सह आयुक्त बुरडे यांनी सांगितले.
मुंबई बाजार समिती बंद राहणार
मराठा मोर्चा यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगार एक महिन्यापासून परिश्रम घेत आहेत. जनजागृतीसाठी बैठका, मेळावे घेण्यात आले आहेत. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी वगळता सर्व मार्केटमधील व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. याशिवाय रेल्वे, एमआयडीसी, स्टील मार्केट व इतर सर्व ठिकाणची कामे बंद ठेवून माथाडी कामगार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
मराठा मोर्चासाठी केलेले आवाहन
मोर्चा शांततेमध्ये पार पडावा यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्तीचे पालन करावे
मोर्चादरम्यान बेवारस वस्तू व संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी
राज्याच्या कानाकोपºयातून येणाºया समाजबांधवांना शक्य ती मदत उपलब्ध करून द्यावी
नवी मुंबईमधील मराठा नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याबरोबर स्वयंसेवकांची भूमिका बजवावी
वाहनतळाच्या ठिकाणी पाणी, नाष्टा, जेवण उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे
मोर्चादरम्यान महामार्गावर व अंतर्गत रोडवर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी काळजी घ्यावी
मोर्चामध्ये एखाद्याची प्रकृती बिघडल्यास तत्काळ आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे.
आवश्यक तिथे धुरीकरण
मोर्चासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व ज्या ठिकाणी आंदोलनासाठी आलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय केली आहे तिथे विशेष धुरीकरण करण्यात आले आहे. याशिवाय रूग्णवाहिका, डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.
वाहन दुरूस्ती पथक
मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपºयातून हजारो वाहने येणार आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वाहनांमध्ये बिघाड होण्याचीही शक्यता असल्याने पनवेल ते वाशी दरम्यान विशेष वाहन दुरूस्ती पथक तयार करण्यात आले आहे. कळंबोली, कामोठे, मानसरोवर, खारघर, बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशीमध्ये मोफत दुरूस्ती करून देणाºया मेकॅनिकचे नाव व फोन नंबर सोशल मीडियामधून सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.