समुद्री वादळाने मासेमारी व्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:11 AM2019-11-06T02:11:23+5:302019-11-06T02:11:52+5:30
दिघी : खराब हवामानामुळे गेले तीन महिने जिल्ह्यातील मासेमारी ठप्प झाली
गणेश प्रभाळे
दिघी : खराब हवामानामुळे गेले तीन महिने जिल्ह्यातील मासेमारी ठप्प झाली असून, शेतकऱ्यांप्रमाणेआता मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमार संघटनेने केली आहे. गेल्या आठवड्यात चक्रिवादळ क्यार व सध्याच्या ‘महा’ वादळामुळे राज्यातील मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चक्रिवादळाचा प्रभाव जास्त असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह रायगड जिल्ह्यातील काही मासेमारी नौका पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर काही नौकांचे किरकोळ नुकसान झाले आहे व नौकांच्या जाळ्या पूर्णत: गेल्या आहेत. सध्या नवीन ‘महा’ वादळामुळे मासेमारीवर सावट आले असून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी परतल्या आहेत. मासेमारीच्या नव्या मोसमाला गेल्या आॅगस्टपासून सुरुवात झाली होती. मात्र, गेले तीन महिने पडत असलेला अवकाळी पाऊस, वादळ यामुळे जिल्ह्यातील सागरीकिनारपट्टीवरील मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे राज्यातील मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग तसेच रोहा अशा समुद्रकिनारी तसेच खाडीलगत असलेल्या तालुक्यातील अनेक गावांत मच्छीमार सध्या मासे मिळत नसल्याने चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला आहे.
एलईडी मच्छीमारीला विरोधच
समुद्रात काही मच्छीमारांनी गेले काही महिने एलईडीद्वारे मासेमारी केली, त्यामुळे मोठ्या माशांसोबत लहान मासेदेखील पकडले जातात. मात्र, बंदी असताना ही लाइटद्वारे मासेमारी केली जाते, त्यावर आणखी निर्बंध आणून कठोर बंदी आणावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.
पहिल्यांदाच असा मासे दुष्काळ
मासेमारीच्या काळातील दुष्काळ परिस्थिती मी पहिल्यांदाच पहिली आहे. सध्या दिघी बंदरात हजारो बोटी वादळामुळे आश्रयाला आल्या आहेत. आॅगस्ट ते डिसेंबर दरम्यान सुरमई सारखी मच्छी मिळत असते. मात्र, वेगवेगळ्या वादळामुळे समुद्रात न जाण्यासाठी मत्स्यालय आयुक्तांकडून पत्र येतात. मासे नसल्याने व्यवसाय तरी कसे करणार, असा प्रश्न एकविरा मच्छीमार सह संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मेंदाडकर यांनी उपस्थित केला आहे.
आॅगस्ट महिन्यापासून आमच्या नौका किनाºयाला लागल्या आहेत. सलग चार-पाच दिवसांत वादळ तसेच जोरदार पाऊस असल्याने मच्छीमार समुद्रात जात नाहीत. शिवाय, डिझेल परतावेही मिळालेले नाहीत. शासनाने वेळीच लक्ष देऊन मच्छीमारांनाही मदत द्यावी, तसेच मासेमारी दुष्काळ जाहीर करावा.
- जनार्दन गोवारी,
माउली कृपा सह. संस्था, दिघी.