महिन्याअखेर सुरू होणार सागरी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 07:07 AM2018-05-06T07:07:27+5:302018-05-06T07:07:27+5:30
मांडवा(अलिबाग) ते भाऊचा धक्का (मुंबई) दरम्यानच्या सागरी वाहतुकीसाठी १३५ कोटी रुपये खर्चाच्या वाहनांसह, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रो-रो सेवेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रो-रो प्रकल्पाआधी मांडवा येथील, लाटांचा जोर कमी करण्यासाठी आवश्यक ‘ब्रेकवॉटर वॉल’ ७२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली.
- जयंत धुळप
अलिबाग : मांडवा(अलिबाग) ते भाऊचा धक्का (मुंबई) दरम्यानच्या सागरी वाहतुकीसाठी १३५ कोटी रुपये खर्चाच्या वाहनांसह, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रो-रो सेवेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रो-रो प्रकल्पाआधी मांडवा येथील, लाटांचा जोर कमी करण्यासाठी आवश्यक ‘ब्रेकवॉटर वॉल’ ७२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. मात्र, बंदरातील गाळ काढण्याचे काम बाकी होते. सद्यस्थितीत हा गाळ काढण्यात येत आहे. सध्या शून्य भरती रेषेपेक्षा तीन मीटर इतकी पाण्याची खोली येथे आहे. गाळ काढल्याने ही खोली आणखीन वाढेल, अशी माहिती मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का आणि मांडवा येथील जेट्टींचे काम पूर्ण झाले आहे. रो-रो सेवेअंतर्गत मांडवा बंदरात येणाºया मोठ्या बोटी सहज थांबून नांगरता याव्यात, यासाठी बंदरातील गाळ काढणे आवश्यक होते. पूर्ण ओहोटी असताना अधिक वजनाच्या फेरीबोटी मांडवा जेट्टीपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. परिणामी, प्रवाशांना फेरीबोटीत चढता-उतरताना त्रास होत असे. आता गाळ काढल्याने मोठ्या बोटीही बंदरात सहज लागू शकतात. यामुळे बोटींची वाहतूक वाढणार आहे. मार्गिकेत असलेल्या गाळात बोटी रु तण्याची शक्यता जास्त असल्यास बोटीमध्ये जास्त प्रवासी घेतले जात नाहीत. गाळ काढल्याने प्रवासी क्षमता वाढेल, असे देवरे यांनी सांगितले.
मांडवा जेट्टी येथे गाळ काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, लवकरच मांडवा बंदर गाळमुक्त होणार आहे. पूर्वी भाऊच्या धक्क्यावरून कोकणात नियमित प्रवासी जलवाहतूक होत असे. रेवस येथे रामदास व मालवण येथे तुकाराम या बोटी बुडाल्या. त्यानंतर ही वाहतूक बंद झाली आणि कोकणातील प्रवासी वाहतुकीची बंदरे गाळाने भरली. दरम्यान, राज्य परिवहन मंडळाची एसटी बस कोकणातील गावागावांत पोहोचली आणि सागरी जलवाहतूक बंद झाली होती; आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेऊन, त्याकरिता सागरमाला प्रकल्पांतर्गत आवश्यक नियोजन व निधीची तरतूद केल्याने कोकणातील सागरी जलमार्ग आता पुन्हा जिवंत होणार आहेत.
पर्यटन, स्थानिक रोजगार वाढणार
केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत भाऊचा धक्का ते मांडवा ही प्रवासी रो-रो सेवा मे महिन्याच्या प्रारंभी सुरू करण्यात येणार होती; परंतु आता ती मे अखेरीस सुरू हाईल, असा विश्वास मेरीटाइम बोर्डाचा आहे.
रो-रो सेवेकरिता मांडवा बंदरात आधुनिक सोयींनीयुक्त असे पॅसेंजर टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. मांडवा जेटीमध्ये टर्निंग प्लॅटफॉर्म, अॅप्रोच जेटी, टर्मिनल वाहनतळ व लिंकस्पॅन यांचा समावेश आहे.
रो-रो सेवा बारमाही सुरू राहणार असल्याने, पावसाळ््याच्या काळात प्रवाशांना ही सेवा उपलब्ध राहणार असल्याने पावसाळी पर्यटनात आणि त्यानिमित्ताने स्थानिक रोजगारातही वाढ होणार आहे.