बाजारपेठा बंद, मात्र रस्त्यावर विनाकामाची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:07 AM2021-04-24T01:07:24+5:302021-04-24T01:08:00+5:30
पनवेल परिसरात कारवाईची भीती राहिली नाही; स्वतःसोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल परिसरातील बाजारपेठा बंद असताना देखील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे वारंवार राज्य शासनासह पालिका, प्रशासनाकडून सांगितले जात आहे. संचारबंदी असताना देखील नागरिकांचा वावर सुरू आहे. कोणतेही काम नसताना आपला आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून ही मंडळी भटकंती करताना दिसून येत आहेत. यावर वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात दररोज साडेसहाशेच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तरीसुद्धा नागरिकांमध्ये गांभीर्य राहिलेले दिसून येत आहे. १४ एप्रिलपासून संचारबंदी घोषित केली. त्यानुसार पनवेल पालिका क्षेत्रातील बाजारपेठा बंद असल्यातरी अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसून येतात. पनवेल परिसरातील बसस्थानक परिसर, उरण नाका, नवीन पनवेल त्याचबरोबर कळंबोली करवली नाका, कामोठे सेक्टर ३६ परिसरात मोठ्या प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. पोलिसांकडून अडवणूक केली तर विविध कारणे पुढे करत आपली सुटका करून घेत आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी परिसरात कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरात संध्याकाळी नागरिक गप्पा मारताना दिसून येतात. विनाकारण रस्त्यावर फिरणे तसेच मित्रांसमवेत थांबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच सकाळी भाजी मंडईत गर्दी पहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील सेाशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची ओरड आहे.