पणत्यांनी सजल्या जिल्ह्यातील बाजारपेठा; ८ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत प्रतिनग विक्री

By निखिल म्हात्रे | Published: November 8, 2023 07:08 PM2023-11-08T19:08:10+5:302023-11-08T19:10:03+5:30

या दिव्यांबरोबरच एलएडी लाईटच्या दिव्यांनाही मागणी असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

Markets in the district are decorated with Panatas; Selling from Rs.8 to Rs.50 per unit | पणत्यांनी सजल्या जिल्ह्यातील बाजारपेठा; ८ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत प्रतिनग विक्री

पणत्यांनी सजल्या जिल्ह्यातील बाजारपेठा; ८ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत प्रतिनग विक्री

अलिबाग : दिवाळीनिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठांत सध्या पारंपरिक पणत्यांसोबत विविध आकार व प्रकारातील पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. पणत्यांच्या खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. साध्या मातीच्या भाजलेल्या पणत्या, युज अँड थ्रो आणि नक्षीकाम केलेल्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. तेलाव्यतिरिक्त पाण्यावर पेटणारे दिवे आणि पाण्याचे दिवे बाजारात उपलब्ध आहेत. त्यात विविध आकाराचे दिवे आहेत. ज्याची किंमत ५० रुपयांपासून पुढे आहे. या दिव्यांबरोबरच एलएडी लाईटच्या दिव्यांनाही मागणी असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. बाजारात साध्या, रंगकाम न केलेल्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या ८ रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत प्रतिनग या भावाने उपलब्ध आहेत. रंगकाम केलेल्या आकर्षक व कुंदनजडीत पणत्या ८० रुपयांपासून १७० रुपयांपर्यंत प्रतिडझन या भावाने विक्री होत आहे. रांगोळ्यांचे स्टीकर, स्वस्तिक व लक्ष्मीची पावले १० ते ३० रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत. रांगोळ्यांचे ठसे, रंग भरण्यासाठी जाळीची झाकणे असलेल्या डब्या व रोल यांनाही चांगली मागणी आहे. दारावरील तोरण आणि झुंबरांचेही विविध प्रकार बाजारात पाहावयास मिळत आहेत.

विविध रंग आणि रांगोळ्याही दाखल
रंग- ५ रुपये- ५० ग्रॅम
रांगोळी मिक्स कलर- १० रुपये (डब्या)
रांगोळी पुस्तक- १० ते ५० रुपये
घरगुती उटणे- ५ रुपये एक पॅकेट
मातीचे जाते, सूप, पाटा-वरवंटा उपलब्ध
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणाऱ्या मातीची भांडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्यामध्ये मातीचे जाते, सूप, पाटा वरवंटा, झाडू, मोठी चूल बाजारात उपलब्ध आहेत. यंदा साध्या पणत्यांच्या किमतीत वाढ झाली नाही. मात्र, रंगाचे भाव वाढल्याने रंगीत पणत्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मातीच्या छोट्या भांड्यांनासुद्धा मागणी वाढली आहे.

Web Title: Markets in the district are decorated with Panatas; Selling from Rs.8 to Rs.50 per unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.