गणेशोत्सवासाठी सजल्या बाजारपेठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:18 PM2019-08-26T23:18:38+5:302019-08-26T23:19:04+5:30
खरेदीचा उत्साह : ग्राहकांची इकोफ्रेंडली वस्तूंना मागणी; थर्माकोलऐवजी कापडी, कागदी मखरांना प्राधान्य
पेण : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याने पेणची बाजारपेठ सज्ज झाली आहे.
गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य साधनसामग्री, विजेची उपकरणे, धूप, दीप, अगरबत्ती यांच्यासह बाप्पाच्या आरासीला व सजावटीला लागणारे विविधांगी साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहेत. महापुराचे दु:ख विसरून भक्तगण बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठांत लक्ष्मीची पावले अवतरल्याचे चित्र दिसत आहे.
गणेशोत्सवासाठी पेणच्या बाजारात सजावटीचे विविध प्रकारचे साहित्य, मखर, तोरणे, कंठी हार, विविध प्रकारची कागदी व प्लॅस्टिकची शोभिवंत फुले आदी साहित्यांनी दुकाने सजली आहेत. तसेच पूजेसाठी लागणारे विविध साहित्य त्याचप्रमाणे फळे, फुले, विविध प्रकारचे मोदक, मिठाई, प्रसादासाठी लागणारे पदार्थ मिठाईच्या दुकानात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. विविध प्रकारची विद्युत तोरणे, चक्र, छत्री आदी साहित्य इलेक्ट्रिक दुकानात आली आहेत. तसेच गणपतीसाठी विविध प्रकारची आभूषणे, अलंकारांनी इमेटिशन ज्वेलरीची दुकाने सुशोभित झाली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सर्व प्रकारच्या मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे.
मोती, खड्यांच्या अलंकारांना मागणी
गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असताना मोती, हिरे आणि फुलांचे विविध आकर्षक दागिने बाजारात उपलब्ध आहेत. सोनेरी रंगाच्या जानव्यांपासून ते सोंडपट्टीपर्यंत अनेक आकर्षक दागिने बाजारामध्ये आले आहेत. यंदा मोत्याच्या दागिन्यांसह खडे आणि सोनेरी मुलाम्याच्या दागिन्यांना बाजारामध्ये विशेष मागणी आहे.
प्लॅस्टिकला बाजारामध्ये स्थान नसल्याने सॅटन रिबनच्या लाल, गुलाबी, नारंगी अशा बहुरंगी माळा झळकताना दिसत आहेत. यामध्ये नवलाई आणण्यासाठी गुंफलेल्या मोगऱ्यांच्या कळ्या लक्ष वेधत आहेत. १०० ते १५० रुपयांपर्यंत मोठ्या लांबीच्या माळा उपलब्ध आहेत.
गणपतीसाठी सोनेरी मुलाम्याच्या दागिन्यांची बाजारामध्ये विशेष रेलचेल आहे. केवड्याचे पान, चाफ्याचे, जास्वंदीचे फूल आदी सोनेरी मुलाम्यामध्ये आकर्षक नक्षीकाम केलेल्या वस्तू दिसत आहेत. यामध्ये सर्वात जास्त आकर्षक आहेत ते म्हणजे खºया सोन्याचे दिसावेत असे मुकूट, अगदी पुठ्ठ्याच्या किंवा धातूच्या मुकुटांपेक्षा या मुकुटाची नक्षी विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. याशिवाय विविध नक्षीकाम केलेली बिगबाळी, मोती, पोवळे आणि अमेरिकन हिºयांच्या बिगबाळी, खड्यांच्या सोंडपट्ट्याही उपलब्ध आहेत.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाचा सण मोठ्या जल्लोषात आणि धूमधडाक्यात साजरा करण्याची परंपरा आहे. काहीच दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा सजल्या आहेत. थर्माकोलवर बंदी आल्याने आता सजावटीसाठी विविध कागदी आणि कापडी मखर, विजेची रंगबिरंगी तोरणे, रंगीत कागदे असे विविध साहित्य विक्रीसाठी आले आहे.
अलिबाग, पेण, माणगाव, रोहे, श्रीवर्धन, रसायनी, कर्जत, मुरुड अशा सर्वच तालुक्यातील बाजारपेठा अशा आकर्षक साहित्याने सजल्या आहेत. बाजारपेठांमध्ये धिम्या गतीने खरेदी होताना दिसत असली, तरी शेवटच्या टप्प्यात खरेदी-विक्रीची उलाढाल वाढणार असल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे. गणेशोत्सव जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात.
बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असल्याने गणेशमूर्ती कारखान्यात कलाकार गणेशाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे.
घराघरांमध्ये हा उत्सव साजरा होणार असल्याने बाप्पाच्या आगमनाची चांगलीच लगबग दिसून येत आहे. बाप्पासाठी घरामध्ये रंगरंगोटी केली जात आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी मखर, विद्युत रोषणाई करण्यात काही जण मग्न झाले आहेत. सार्वजनिक मंडळांनीही बाप्पासाठी स्टेज, देखावे निर्मितीवर भर दिला आहे. त्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेताना दिसत आहेत.
पर्यावरणपूरक साहित्याला पसंती
यंदा प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी असल्याने सजावटीसाठी रंगीबेरंगी पडदे, कार्डबोर्ड, जाड पुठ्ठे, लाकडी साहित्याचा समावेश जास्त दिसून येत आहे. याशिवाय कागदी, कापडी फुले, हार, मोत्याच्या माळा, आकर्षक रंगीबेरंगी लाइटिंग, वेगवेगळ्या छटा दर्शवणारे प्रकाश दिवे, बाप्पांसाठी भरजरी वस्त्रे, विविध रांगोळ्या इ.साहित्यांनी मोहोपाडा बाजारपेठ फुलून गेली आहे. संध्याकाळी खरेदीसाठी गणेशभक्त गर्दी करीत आहेत. फरसाण, वेफर्स, मोदक, लाडू, पेढे यांच्या जादा खरेदीसाठी आॅर्डर देऊन बनवून घेण्याकडे कल वाढला आहे. नारळांची आवकही वाढली आहे.