मर्क्स कंपनीतील कामगारांचा टाळेबंदीविरोधात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:59 AM2018-09-29T04:59:52+5:302018-09-29T05:00:31+5:30
कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली.
उरण - कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली. त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट येऊन कोसळले आहे. टाळे ठोकलेल्या गेटसमोरच कामगारांनी शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या हैसा पाटील या पन्नास वर्षीय महिलेने यावेळी आपली व्यथा मांडली. मागील २५ वर्षांपासून कंपनीमुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितो. मात्र राजकीय नेत्यांच्या चिथावणीमुळे कामगारांवर हल्ले झाले. आमची शेती नाही, पतीची बायपास सर्जरी झालेली आहे. आता औषध पाण्याचा आणि कुटुंबाचा खर्च यापुढे कसा भागविणार, अशी भावनिक प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.
द्रोणागिरी नोडमधील २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एमपीएम (मर्क्स) या कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून टाळेबंदी जाहीर केली आहे. कंपनीतील कामगार, अधिकाऱ्यांना काही महिन्यांपासून हिंसक कारवाई आणि धमक्या, मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. सातत्याने होणारे जीवघेणे हल्ल्यामुळे काम करणाºया अधिकारी, कामगारांचे जीव धोक्यात आले. भय, तणाव या परिस्थितीत काम सुरू ठेवणे अशक्य असल्याने कंपनीपुढे टाळेबंदीचाच एकमेव पर्याय असल्याचे कारण पुढे करीत एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून टाळेबंदी जाहीर केली आहे. कंपनीच्या टाळेबंदीच्या निर्णयामुळे या कंपनीत काम करणाºया ४०० कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. बेरोजगार होऊ पाहणाºया एपीएम कंपनीच्या कामगारांनी शुक्रवारपासूनच गेटसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केला आहे. या कंपनीमध्ये सफाईचे काम करणाºया महिलांचाही समावेश आहे.
मागील २५ वर्षांपासून काम करणाºया महिला कामगारांवर टाळेबंदीमुळे उपासमारीचे संकट आल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाह कसा होणार या चिंतेने कामगारांबरोबरच महिलांनाही ग्रासले आहे. टाळेबंदीमुळे कंपनीने एपीएमच्या गेटलाच टाळे ठोकले आहे. कंपनीने निर्णय न बदलल्यास ४ आॅक्टोबर रोजी कामगारांच्या कुटुंबीयांसह उरण तहसीलवर मोर्चा काढणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.