- अनंत पाटील नवी मुंबई : आगरी कोळी समाजातील लग्नसोहळा व हळदीचा कार्यक्रम वाजंत्री, डीजे, नाचगाणी, विद्युत रोशणाई आणि शाकाहारी, मांसाहारी जेवणावळी यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे गांभीर्य ओळखून फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यासाठी वधूवरांकडच्या १० ते १५ जणांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने नवी मुंबईतील वाशी गावातील एका मुलाचा विवाह सोहळा साधेपणाने पार पडला.वाशी गावातील अरुण भोईर यांचा मुलगा मनीष आणि पनवेल तालुक्यातील तक्का गावातील गोपीनाथ सोनके यांची कन्या सुहासिनी यांचा विवाह सोहळा गुरुवारी ११ रोजी सायंकाळी वधूच्या (तक्कागाव, पनवेल) येथील घरी पार पडला. हा अत्यंत कमी खर्चात आणि साधेपणाने विवाह करण्याबाबत या मुलाचे मामा आगरी कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय रामभाऊ पाटील आणि मुलीचे वडील गोपीनाथ सोनके यांच्यात बैठक झाली. लॉकडाऊनच्या परिस्थितीचे भान ओळखून वधूवरांच्या दोन्ही मंडळींकडून होकार मिळताच गुरुवारी लग्नगाठ बांधली. एरव्ही आगरी कोळी समाजात हळदी आणि विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी भिंती तांबडणे, हळदी आणि लग्न असे तीन दिवसांचे कार्यक्रम एकाच दिवशी आटोपून घेतले. सामाजिक जबाबदारी व सुरक्षिततेचे सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पाडल्यामुळे कौतुक होत आहे.लग्नासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढून अनाठायी खर्च करून केवळ पैशाचा चुराडा करणे योग्य नाही. आगरी कोळी समाजाने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून अनाठायी खर्च न करता तोच पैसा त्यांच्या संसारासाठी दिला तर योग्य होईल.- रामभाऊ पाटील, ज्येष्ठ नागरिक, वाशी गाव, नवी मुंबई
सामाजिक अंतर पाळून साधेपणाने बांधली लग्नगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:38 AM