विवाहितेला बाळासह सोडले अहमदनगरला, पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:18 AM2020-06-12T00:18:22+5:302020-06-12T00:18:43+5:30
पतीसोबत भांडण झाल्याने सोडले घर : न्हावा-शेवा पोलिसांची कामगिरी
मधुकर ठाकूर
उरण : पतीबरोबर झालेल्या भांडणामुळे वैतागून आपल्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन कंटाळून मामाकडे निघालेली महिला चुकून जेएनपीटी परिसरात पोहोचली. या महिलेला न्हावा-शेवा ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावातील बहिणीकडे सुखरूप पोहोचविले. अवघड काळातही माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावातील शीतल राजू खंदारे (२२) ही पती आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह राहते. १ जून रोजी तिचे पतीसोबत भांडण झाल्याने ती रागाच्या भरात बाळाला घेऊन पुण्यात राहणाºया मामाच्या घरी जाण्यास निघाली. त्यासाठी रस्त्यावर उभे राहून एका ट्रकचालकास विनवणी केल्याने तिला ट्रकचालकाने चाकण येथे सोडले. तिथून आणखी पुढे जाण्यासाठी दुसºया ट्रकचालकास सांगितल्यावर त्याने तिला न्हावा-शेवा परिसरात सोडले. खूप रात्र असल्याने व हा परिसर अनोळखी असल्याने ती जेएनपीटी परिसरात बाळाला घेऊन भटकत राहिली. या वेळी रात्रीच्या अंधारात तिच्यामागे कुत्रे लागल्याने ती घाबरून धावू लागली. धावताना ती न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी या महिलेची चौकशी करून तिला बाळासह महिला कक्षात ठेवले. त्यानंतर शीतलच्या मामाला फोनवरून माहिती दिली. मात्र मामाने तिला घरात घेण्यास नकार देऊन फोन बंद केला. यादरम्यान शीतलची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वच रिपोर्ट नॉर्मल होते. त्यामुळे या महिलेला काही दिवस आश्रमात ठेवण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सल्ला दिला. त्यानुसार शीतलला तिच्या बाळासह महिला आश्रमात नेण्यात आले. मात्र तिला आश्रमात ठेवण्यास नकार देण्यात आला. रागाच्या भरात पतीकडे जाण्यासही शीतल तयार नव्हती. त्यामुळे या महिलेला ठेवायचे कुठे, असा प्रश्न पोलिसांपुढे होता. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड यांनी शीतलची आई, पती आणि भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी शीतलच्या बहिणीशी संपर्क साधून तिला तिच्या बाळासह घेऊन जाण्यास सांगितले. तर शीतलच्या बहिणीनेसुद्धा तिच्या घरची परिस्थिती बिकट असल्याचे सांगून शीतलला घेण्यास असमर्थता दर्शविली.
अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड यांनी स्वत: शीतलच्या बहिणीकडे नेऊन सोडण्याचे निश्चित केले. सपोनि ज्योती गायकवाड, पोलीस हवालदार नीलेश भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याशी चर्चा करून शीतल आणि बाळाला स्वखर्चाने अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी फाटा येथे राहणाºया बहिणीकडे नेऊन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
आई-वडील गेले घेऊन
न्हावा-शेवा ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड व पोलीस हवालदार नीलेश भोसले यांनी शीतल व तिच्या बाळाला बहिणीकडे सुखरूप सोडले. त्यानंतर तिचे आई-वडील तिला घरी घेऊन गेले असल्याची माहिती मिळाल्याचे ज्योती गायकवाड यांनी सांगितले.