शहिदांची शौर्यगाथा ठरते प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 04:00 AM2018-08-15T04:00:42+5:302018-08-15T04:01:39+5:30

राजस्थानमधील बिकानेर येथील जाल बडी पंचायत क्षेत्रात हवाई दलाच्या धावपट्टीवर मिग विमानाचा नेहमीचा सराव सुरू होता. अवघ्या २४ वर्षांचा उमदा पायलट फायटर विमान उडवत होता. अचानक तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाले आणि फ्लाइंग लेफ्टनंट तुषार चव्हाण यांना वीरमरण आले.

martyrs inspiration news | शहिदांची शौर्यगाथा ठरते प्रेरणादायी

शहिदांची शौर्यगाथा ठरते प्रेरणादायी

googlenewsNext

- वैभव गायकर
पनवेल : राजस्थानमधील बिकानेर येथील जाल बडी पंचायत क्षेत्रात हवाई दलाच्या धावपट्टीवर मिग विमानाचा नेहमीचा सराव सुरू होता. अवघ्या २४ वर्षांचा उमदा पायलट फायटर विमान उडवत होता. अचानक तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाले आणि फ्लाइंग लेफ्टनंट तुषार चव्हाण यांना वीरमरण आले.
शहीद फ्लाइट लेफ्टनंट तुषार शामराव चव्हाण यांचा जन्म १ मे १९८१ रोजी झाला. वडील शामराव अंतू चव्हाण हे मूळचे सांगली येथील, हवाई दलाचे कर्मचारी होते. १९९६ साली पुणे, खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकादमी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. २००० मध्ये ते पासआउट झाले आणि २००२ मध्ये एअर फोर्स फ्लाइंग अकादमी हैदराबाद मध्ये ट्रेनिंग घेतले. त्याच वर्षी त्यांना फ्लाइंग आॅफिसर ही हवाई दलातील महत्त्वाची रँकिंग मिळाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पोस्टिंग गुजरातमधील भुज या ठिकाणी झाले. २००४ साली त्यांची बदली राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी झाली. हवेतूनच शत्रूंशी दोन हात करणारे मिग २१ या विमानावर ते फ्लाइंग लेफ्टनंट म्हणून कार्यरत असताना ८ मार्च २००५ रोजी विमान क्रॅश होऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले. मिग २१ हे विमान त्या वेळी कफन बॉक्स म्हणून कुविख्यात झाले होते. तुषार चव्हाण यांना शहीद घोषित करण्यासाठी त्यांचे वडील शामराव यांनी राष्ट्रपती ते हवाई दलातील बड्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. देशसेवेत कार्यरत हवाई दलातील उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या मुलाला शहीद दर्जा प्राप्त करण्यासाठी देखील वडील शामराव यांनी खूप मेहनत घेतली. अखेर तुषार यांना शहीद घोषित केल्याने शामराव यांच्या प्रयत्नांना यश आले.

शामराव व अंजनी चव्हाण हे तुषारचे आईवडील. आज तब्बल १३ वर्षांनंतरही चव्हाण कुटुंबीयांच्या मुलाबद्दलच्या स्मृती ताजा आहेत. मिग २१ च्या अपघातापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजेच ७ मार्च २००५ रोजी तुषारचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. या वेळी लवकरच रजेवर येणार असल्याचे त्याने आईला सांगितले. मात्र, तो दिवस कधी आलाच नसल्याचे अंजनी यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले.

यूपीएससीच्या माध्यमातून हवाई दलात प्रवेश करून फ्लाइट लेफ्टनंट या पदापर्यंत मजल मारलेले तुषार शामराव चव्हाण यांना ८ मार्च २००५ रोजी वीरगती प्राप्त झाली. अतिशय प्रेरणादायी असा तुषार चव्हाण यांचा प्रवास अवघ्या २४ व्या वयात त्यांनी भूषविलेली विविध पदे ही अभिमानास्पद आहेतच आणि देशातील नव्या पिढीला प्रेरणा देणारीही आहेत.

शामराव चव्हाण यांच्या पुढाकाराने, नवीन पनवेल सेक्टर १० मधील मैदानाला शहीद फ्लाइट लेफ्टनंट तुषार चव्हाण हे नाव देण्यात आले. याच ठिकाणी हवाई दलालामार्फत शहीद तुषार चव्हाण यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून एक मोडकळीस आलेले हवाई दलातील विमान बसविण्याची मागणी तुषार यांचे वडील शामराव यांनी हवाई दलाकडे केली आहे.

मिग २१ लढावू विमान
मिग २१ हे लढावू विमान शत्रूशी हवेतच दोन हात करण्यासाठी तयार करण्यात आले होते. यामध्ये अत्याधुनिक मिसाइल, तसेच हवेतूनच गोळीबार करण्यासारख्या यंत्रणा बसविण्यात आल्या होत्या. मात्र, या विमानाचे आजवर अनेक अपघात झाले असल्याने या विमानाला कफन बॉक्स म्हणून संबोधले जात होते.

Web Title: martyrs inspiration news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.