- संदीप जाधव महाड : शहीद जवान प्रथमेश दिलीप कदम यांच्या पार्थिवावर गुरुवारी शोकाकूल वातावरणात शेवते या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.१२ मे रोजी भोपाळ येथे झालेल्या रेल्वे अपघातात बचावकार्यादरम्यान अपघाताचे पुरावे गोळा करताना वीजवाहिनीचा स्फोट होऊन, त्यात कदम गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवार, १५ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी शेवते येथील स्मशानभूमीत भारतीय लष्कराच्या भोपाळ येथील ३ एमईएम युनिटचे सुभेदार मेजर आर. बी. तांबे, हवालदार एस. ए. काशिद, हवालदार अमोल जाधव, मुंबई युनिटचे मेजर नरेश कुमार यांनी प्रथमेश कदम यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. तर, रायगड पोलीस दलाच्या सशस्त्र तुकडीने बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडून कदम यांना अखेरची सलामी दिली.
शहीद प्रथमेश कदम अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:50 AM