‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:19 AM2021-11-11T08:19:04+5:302021-11-11T08:19:11+5:30

पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना हवा थांबा

Mass self-immolation in Mumbai today for Memu Train; Demand for direct trains from Pen to Panvel, Mumbai, Dahanu | ‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

Next

वडखळ : पेण रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल मेमू ही प्रवासी शटल रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, तसेच पेण व रोहा स्थानकातून इएमयू किंवा मेमूची सेवा ही छत्रपती शिवाजी टर्मिनल व दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणू रोडपर्यंत तातडीने सुरू करण्याची मागणी ‘मी पेणकर आम्ही पेणकर’ शाश्वत विकास समितीने निवेदनातून मध्य रेल्वेकडे केली आहे, तसेच ही सेवा तातडीने सुरू न झाल्यास ११ नोव्हेंबरला पेण-पनवेल मेमूच्या वाढदिवशीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

मुंबईला अत्यंत जवळ असे, तसेच रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले पेण हे जागतिक दर्जाचे  श्री गणपती व कलात्मक मूर्ती बनविण्याचे ठिकाण आहे. पेणचे पोहे, पापड, कुरडई, कडवे वाल, पेणची ताजी भाजी, ओली व सुकी मासळीही देशात, तसेच जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या पेण स्थानकातून जलद गाडी, हॉलिडे स्पेशल व पेण ते  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ईएमयू रेल्वे सेवेची मागणी ‘मी पेणकर आम्ही पेणकर’ शाश्वत विकास समितीकडून केली जात आहे. 
या सेवेमुळे विद्यार्थी व कामगार वर्गाचा प्रवास सोईस्कर होणार आहे. विशेष म्हणजे, याबाबत दिल्ली येथे झालेल्या  प्रमुख अधिकारी सिग्नल  व ट्राफिक प्रमुख यांनी पाहणी केल्यानंतर सेवा सुरू करण्याबाबतचा अहवालही दिला आहे. मात्र पुढे काय झाले असा प्रश्न पडला आहे.

मध्य रेल्वेकडून निर्णय घेण्यात टाळाटाळ

जलद गाडी व हॉलिडे, विशेष गाड्या यांना विनंती थांबा व सर्व पेण-पनवेल-पेण ही ईएमयू व मेमू रेल्वे देण्याचा अधिकार महाव्यवस्थापकांना दिले आहेत, तरीही याबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ होत असल्याने, मूलभूत प्रवासी मानव अधिकाराचा हक्क मिळविण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महाव्यवस्थापकांच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात  सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मदहनाचा इशारा समितीने दिला आहे.

पेणकरांचा लढा मूलभूत प्रवासी मानव अधिकाराचा हक्क मिळविण्यासाठी आहे. याच अनुषंगाने गुरुवारी मुंबईतील महाव्यवस्थापक  मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात  सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मदहन करणार आहोत. या आंदोलनाला सर्वस्वी मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे. - योगेश म्हात्रे, समन्वयक, ‘मी पेणकर आम्ही पेणकर’, शाश्वत विकास समन्वय समिती

Web Title: Mass self-immolation in Mumbai today for Memu Train; Demand for direct trains from Pen to Panvel, Mumbai, Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.