महाडमध्ये भीषण स्फोट, ११ बेपत्ता; पाच कामगार जखमी, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:39 AM2023-11-04T08:39:13+5:302023-11-04T08:39:30+5:30
औषधांच्या कारखान्यातील दुर्घटना, पाच कामगार जखमी, एक गंभीर
सिकंदर अनवारे
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : महाडच्या औद्योगिक क्षेत्रातील ब्लू जेट हेल्थ केअर लिमिटेड या औषधनिर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ११ कामगार बेपत्ता झाले असून, पाच कामगार जखमी झाले आहेत. स्फोटात कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला. बेपत्ता कामगारांच्या शोधासाठी पुण्याहून ‘एनडीआरएफ’चे पथक बोलावण्यात आले आहे. ते रात्री दाखल झाल्यानंतर शोधकार्य पुन्हा सुरू होणार होते.
अंजनेय बायोटेक हा प्रकल्प येथे होता. तो दोन वर्षे बंद होता. तेथे नव्याने ब्लू जेट नावाने कारखाना सुरू होत असून, त्याच प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू होते. ते करीत असतानाच सकाळी १० च्या सुमारास एका रिॲक्टरमध्ये स्फोट झाला आणि त्यातील ज्वलनशील रसायन सर्वत्र पसरले. त्यामुळे आणखी काही रिॲक्टर फुटले आणि मोठमोठे स्फोट होत आग पसरत गेली. स्फोट होताच कामगार सैरावैरा पळत सुटले. त्यातील काही भाजले होते. त्यांनी शेजारच्या विरल, झुआरी आणि ॲक्वा फार्म या कंपनीत आश्रय घेतला. ज्या प्लांटला आग लागली त्याशेजारीच विरल कंपनीचा प्लांट असल्याने तेथील कामगारांनी फोमच्या साह्याने आग विझविण्यास सुरुवात केली. अन्य कंपन्यांतूनही फोम आणून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू झाले; मात्र आग आटोक्यात आली नाही.
या दुर्घटनेत विक्रम डेरे, निमाई मुरमक, मयूर निंबाळकर, राहुल गिरासे, स्वप्नील आंब्रे हे कामगार जखमी झाले; तर अभिमन्यू, जीवन कुमार, विकास महतो, संजय पवार, शेषराव भुसाने, अक्षय सुतार, सोमनाथ वायदंडे, विशाल कोळी, आदित्य मोरे, अस्लम शेख, सतीश साळुंखे हे ११ जण बेपत्ता आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.