मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:36 AM2017-07-18T02:36:23+5:302017-07-18T02:36:23+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी

Massive rain disrupts life span | मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Next

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी ५० टक्क्यांवर रखडलेल्या भात लावण्यांना चांगलाच वेग आला असून रविवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत १०० टक्के भात लावण्या पूर्ण होतील आणि बुधवारी १९ जुलै रोजी उंदीर या आपल्या वाहनावरून येणाऱ्या पुष्य नक्षत्राचा मध्यम स्वरूपाचा पाऊस भात लावण्यांना पोषक ठरू शकेल असा अंदाज शेतकरी बाळकृष्ण जोशी यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १३० मि.मी. पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. महाड १२९, पेण १२५.३०, माणगाव १११,तळा १०१,पोलादपूर ९५, श्रीवर्धन ९०, सुधागड ७९, मुरुड ७२, खालापूर ७०,रोहा ६९, अलिबाग ६७,पनवेल ४९.८०, उरण ४७, कर्जत ४२.६० आणि गिरिस्थान माथेरान येथे ८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांतील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८७.९२ मिमी आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी नियंत्रणात होती, मात्र जलप्रवाहात वाढ झाली आहे. वीजनिर्मितीत महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ६९ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जून २०१७ पासून येथे एकूण २१४५.६०मिमी पाऊस झाल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. धरणाची संकल्पित जलसंचय क्षमता ९.०९० दलघमी असून सद्यस्थितीत जलसंचय ४.७५५ दलघमी झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता धरणातील जलपातळी ९४.६५ मीटर होती. धरणातील जलपातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता रविवारी ०.४११९ दलघमीचा जलविसर्ग सोडण्यात आला तर यंदाच्या पावसाळ््यात आतापर्यंत १९.४६२३ दलघमीचा जलविसर्ग सोडण्यात आला. सद्यस्थितीत धरणाचे तीनही दरवाजे बंद असल्याची माहिती कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

२८ लघुपाटबंधारे धरणांपैकी
२० धरणे १०० टक्के भरली
जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी २० धरणे १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरली असून वाहू लागली आहेत. पूर्ण क्षमतेने भरलेल्या या २० धरणांमध्ये फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), सुधागड तालुक्यात कोंडगाव, घोटवड, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी (श्रीवर्धन), म्हसळा तालुक्यात पाभरे व संदेरी, महाड तालुक्यात वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे, खालापूर तालुक्यात भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवट, पनवेल तालुक्यातील मोरबे व उसरण यांचा समावेश आहे.
उर्वरित आठ धरणांमध्ये अंबेघर (पेण) ३२ टक्के, श्रीगाव (अलिबाग) ३० टक्के, कार्ले (श्रीवर्धन) ४४ टक्के, रानिवली (श्रीवर्धन) ३६ टक्के, साळोख (कर्जत) ५३ टक्के, अवसरे (कर्जत) ८६ टक्के, बामणोली (पनवेल) ६८ टक्के, पुनाडे (उरण) ५५ टक्के भरली आहेत.

Web Title: Massive rain disrupts life span

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.