माथेरान : येथील दस्तुरी नाक्यावर घोडेचालकांकडून पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे, असा आरोप करून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवारी माथेरान बेमुदत बंदची हाक दिली होती.
दुसऱ्या दिवशी बुधवारी आ. महेंद्र थोरवे यांनी समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे हा बंद मागे घेण्यात आला आहे.
मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेशबंदबाबत फसवणुकीचे आरोप झालेल्या घोडेचालक आणि समिती सदस्यांची आ. थोरवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आ. थोरवे यांनी सुयोग्य पद्धतीने तोडगा काढून दस्तुरी नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वारामधूनच प्रवेश देण्यात यावा, असे सूचित केले.
दक्षता घ्यावीघोडे चालक, हमाल आदींनी पर्यटकांच्या वाहनांभोवती गराडा घालून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी या मुख्य प्रश्नावर लक्ष केंद्रित करून ठोस उपाययोजना करावी, असे आदेशही थोरवे यांनी दिले. त्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद अखेर मागे घेतला.