माथेरान : प्रसिद्धीचा हव्यास आणि सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी हल्ली बॅनरबाजीचे सर्वत्र पेव फुटले आहे. राजकीय पक्षांकडून शुभेच्छांचे, निवडीबद्दल अभिनंदनाचे, वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे बॅनर्स सध्या शहरात मोठ्या संख्येने पाहायला मिळत होते. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावरून बॅनरबाजीला माथेरानमध्ये लगाम बसला आहे, त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून विकसित शहराचे विद्रूपीकरण थांबल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
थंड हवेच्या ठिकाणी आणि मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, पर्यटक गावात आल्यावर त्यांच्या नजरेस सर्वात आधी काय दिसते तर बॅनरबाजी आणि त्यामुळे गावाचे झालेले विद्रूपीकरण. याबाबत सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्यावर ही बॅनरबाजी थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते.मागील काही काळात माथेरानचा राम मंदिर चौक, बाजारपेठ परिसर व इतरत्र राजकीय पक्षांची पोस्टरबाजी वाढलेली आहे.बॅनर बाबतीत उच्च न्यायालयात १५५ /२०११ अन्वये रीतसर याचिका दाखल झालेली आहे. याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली असून नगरपरिषदेच्या माध्यमातून काटेकोरपणे पालन केले जात आहे. गावात विशेषत: माथेरानसारख्या या सुंदर ठिकाणी बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होताना सुज्ञ नागरिकांकडून याचा तिरस्कार केला जात आहे. निदान सध्यातरी लोकांच्या मनात चांगली भावना निर्माण झालेली दिसून येत आहे.- रामदास कोकरे, प्रभारी मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद