मुकुंद रांजणे
माथेरान : सध्या सुरू असलेल्या परीक्षांमुळे माथेरानमध्ये मंदीचे सावट असून मागील दोन महिन्यांपासून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने येथील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहावयास मिळते. येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्याचा फटका येथील हॉटेल व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिक, हातरिक्षा चालक व अश्वचालकांना बसत आहे. पर्यटन हंगामासाठी आपल्या दुकाने सजविलेल्या छोट्या व्यावसायिकांनी कर्जे काढून दुकानात माल भरलेला आहे त्यांची व्याजाची रक्कम निघणेही अवघड झाले आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना नोकरांचे पगार व हॉटेल मेटेनन्सचा खर्चही निघत नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. माथेरान पर्यटन नगरीमध्ये वीज,पाणी व शासकीय कर यांचे दर खूपच जास्त आहेत ते भरताना येथील लोकांची दमछाक होत आहे. हातावर पोट असलेले हातरिक्षा व अश्वचालक यांची दिवसातून एकही फेरी होत नसल्याने भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.माथेरानचे पर्यटन एक दिवसावर येऊन ठेपल्याने येथे हा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणाºया पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने येथील स्थानिक रोजगार गमावू लागला आहे. येथील मुख्य बाजारपेठेत दिवसाही शुकशुकाट दिसत आहे, त्यामुळे माथेरानचे पुढील पर्यटन हंगामामध्ये कसे होणार या विचारानेच व्यावसायिक खचले आहेत. माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा असून, शासकीय नियमांच्या जाचक अटींमुळे माथेरानचे पर्यटन धोक्यात आले आहे.वर्षानुवर्षे माथेरानमध्ये पर्यटन वाढीस असणारे प्रकल्प झालेले नाहीत. येथील रस्ते, दळणवळण, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी येथे पालिकेची कोणतीही सोय नाही एक दिवस राहिल्यानंतर पर्यटक दुसरीकडे जात आहेत. माथेरानच्या पायथ्याशी अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज पार्क होत आहेत, पण माथेरान आजही दुर्गम पर्यटन स्थळ आहे. दळणवळण खर्चीक असल्याने पर्यटक येथून जाताना वाईट अनुभव घेऊन जात आहेत.मिनीट्रेनला फटकाच्मंदीचा फटका येथील मिनीट्रेनलाही बसला आहे. येथील रेल्वेस्थानकात शुकशुकाट असल्याने ही सेवा घाट्यात सुरू आहे. जे पर्यटक येत आहेत ते एकाच दिवसात परत जात असल्याने ते रस्त्याने येत आहे, त्यामुळे मिनीट्रेनमध्ये बसणारा पर्यटक वर्ग कमी झाला आहे.