माथेरान: माथेरान हे मुंबई पुण्यापासून सर्वात जवळचे पर्यटनस्थळ आहे त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. सध्या लॉकडाऊनमुळे येथे बहुतेक पर्यटक स्वतःचे वाहन घेऊनच येत आहेत, त्यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.माथेरानकरिता नेरळहून एकमेव मार्ग उपलब्ध आहे. वीकेंडला माथेरानमध्ये गर्दी असते व अशा वेळी येथील प्रवेशद्वारावर येणाऱ्या पर्यटकांना गाड्यांच्या गर्दीतून वाट काढण्यास दोन तास लागत आहेत. एमएमआरडीएच्या निधीतून माथेरान प्रवेशद्वार येथे सुसज्ज वाहनस्थळ उभारण्यात येत आहे, पण ही जागा वाहनस्थळासाठी अपुरी पडत आहे. या वाहनस्थळाला लागूनच माथेरान नगरपालिकेचा भूखंड क्र.९३ हा वाहनस्थळासाठी उपलब्ध आहे व येथे पार्किंगची सोय झाल्यास माथेरानमध्ये येणाऱ्या गाड्यांचा वाहनस्थळाचा कायमचा प्रश्न मिटणार आहे, पण हा भूखंड परवानग्याच्या फेऱ्यात अडकला आहे, पण तोपर्यंत या जागेवर अनेक घोडेवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे व त्यांना बाहेर काढून पालिका हा भूखंड ताब्यात घेण्यास अपयशी ठरताना दिसत असल्याचे चित्र आहे. या भूखंडावर पार्किंगची सोय उपलब्ध झाल्यास माथेरानचा फार मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. वीकेंडला नेरळ माथेरान घाटामध्ये लांबच्या लांब रांगा लागत असल्याने अनेक वेळा पर्यटकांशी बाचाबाचीचे प्रसंग घडताना दिसत आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामामुळे वाहनकोंडीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. नेरळ-माथेरान मिनिट्रेन सुरू झाल्यास त्याचा फायदा या रस्त्यावर होणाऱ्या वाहनकोंडी कमी होण्यास होणार आहे, पण रेल्वे प्रशासन नेरळ माथेरान मिनिट्रेन सुरू करण्याच्या मनस्थितीत नसल्याचेच दिसत आहे, अपुरी इंजिने असल्याचे कारण सुरुवातीस दाखविले जात होते, नंतर रेल्वे लाइन सुरक्षिततेचे कारण पुढे केले गेले, पण ही सेवा सुरू असणे हे माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मिनिबसच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यास काही प्रमाणात वाहनकोंडीपासून सुटका होऊ शकते. त्यामुळे निदान वीकेंडला तरी या बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
माथेरानमध्ये भेडसावत आहेत वाहतुकीचे प्रश्न, वीकेंडला पर्यटकांची गर्दी, गाड्या पार्क करायला जागा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 12:25 AM