माथेरानचा घाट आधुनिक तंत्रामुळे प्रवासासाठी सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:38 PM2019-05-20T23:38:42+5:302019-05-20T23:38:51+5:30
एमएमआरडीएने के ले काम : नेरळ ते दस्तुरी नाका असा सात किलोमीटरचा रस्ता
- कांता हाबळे
नेरळ : मुंबईपासून जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यामुळे अधिक आकर्षक बनला आहे. नेरळ ते माथेरान दस्तुरी नाका असा सात किलोमीटरचा घाटरस्ता पर्यटकांच्या वाहनांसाठी सुरक्षित बनला आहे. दरम्यान, यावर्षीचा उन्हाळी पर्यटन हंगाम रस्त्यामुळे अधिक सुरक्षित बनला आहे.
ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर पोहचण्यास आजतागायत केवळ दोन मार्ग अस्तित्वात आहेत. रोपवे आणि अन्य दोन ठिकाणी रस्ते बनवावेत अशी मागणी आहे, परंतु माथेरान परिसर हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने संवेदनशील बनविण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नवीन रस्ते साकारण्याची शक्यता फार दुर्मीळ आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेला रस्ता सुस्थितीत ठेवून येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास हा विनाअडथळा आणि सुखकर तसेच अपघातमुक्त व्हावा यासाठी शासनाचा प्रयत्न होता. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नेरळपासून माथेरानच्या दस्तुरी नाक्यापर्यंतचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि या रस्त्याच्या कामासाठी २७ कोटींचा निधी मंजूर केला. रस्त्याची रुंदी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी वाढविण्याबरोबर सर्व रस्त्याला दरीकडे असलेल्या धोकादायक बाजूला संरक्षक भिंत आणि रस्त्यावरून पाणी वाहत जाऊन रस्ता खराब होतो हे नेहमीची समस्या लक्षात घेऊन सर्व रस्त्याला सिमेंटची गटारे बांधण्यात येणार होती. रस्त्यावर वाहने थांबवून ठेवण्यासाठी काही मोकळ्या जागा आणि सुरक्षित प्रवास होण्यासाठी आवश्यक गोष्टी यांची तरतूद एमएमआरडीएने आपल्या या प्रकल्पात केली होती. त्यानुसार नेरळ- माथेरान दस्तुरी नाका रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पर्यटकांसाठी सुरक्षित आणि आधुनिक सुविधा देणारा घाटरस्ता तयार झाला आहे.
नेरळ-माथेरान घाटरस्त्यात काही ठिकाणी अवघड चढाव आहेत,ते लक्षात घेऊन नव्याने आपली खासगी वाहने घेऊन येणारे वाहन चालक यांच्यासाठी गाडीची गती किती ठेवावी याची माहिती देण्यात आली आहे.
च्नेरळ येथील हुतात्मा चौकातून सुरू झालेल्या रस्त्यावर सात किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या संरक्षण भिंती यांच्या बाजूला रेडियमचे तुकडे चिटकविण्यात आले आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध देखील पट्टे मारून रस्त्याची लेन निश्चित करण्यात आली आहे. चढाव,वळणे यांची माहिती देणारे तसेच शाळा आणि गाव असलेल्या ठिकाणी बनविण्यात आलेले गतिरोधक यांची माहिती देखील फलक लावून देण्यात आली आहे. ज्या काही ठरावीक ठिकाणी अवघड वळणे नेरळ- माथेरान घाटरस्त्यावर आहेत,त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सिग्नल यंत्रणा सौर उर्जेवर बसविण्यात आली असून त्यात एलईडी दिव्यांची सोय करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतींना पिवळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे, त्यामुळ हा रस्ता अधिक सुरक्षित झाला आहे.
आम्ही मुंबईच्या धर्तीवर रस्त्याचे काम करण्याचा आणि त्यात पर्यटक प्रवासी यांची वाहने तसेच पर्यटक यांच्यासाठी सुरक्षित प्रवास देण्याचा प्रयत्न रस्त्याच्या माध्यमातून केला आहे. माथेरानमध्ये कोसळणारा भरपूर पाऊस लक्षात घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करताना दर्जा कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.
- अरविंद धाबे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए