माथेरान : कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने राज्यातील पर्यटनही प्रभावित झाले असून पर्यटनास बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची संख्या घटू लागल्याने त्याचा फटका पर्यटन क्षेत्रांना बसू लागला आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये घट झाली असून मुख्य बाजारपेठेत गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन सदृश परिस्थिती पाहावयास मिळत आहे.
माथेरानमधील सर्वच आर्थिक व्यवहार हे पर्यटनावर अवलंबून आहेत. पर्यटकांची संख्या कमी होताच येथील आर्थिक घडी बिघडत असते गेल्यावर्षी ऐन पर्यटन हंगामामध्ये लॉकडाऊन लागल्याने येथील व्यावसायिक अजूनही कर्जाच्या बोजाखाली वावरत आहेत. या काळातील वीज व पाणी बिले भरण्यासाठी अजूनही झगडत आहेत. त्यातच देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा थेट परिणाम येथील पर्यटनावर झाला आहे. येथील बहुतेक हॉटेलमधील आगाऊ बुकिंग रद्द झाल्या आहेत व प्रतिसाद ही खूप कमी झाल्याने माथेरानकरांसाठी हे एक प्रकारे अघोषित लॉकडाऊनच ठरत आहे. त्यातच वीज वितरण व जलप्राधिकारणाने देयके न भरल्यामुळे जोडण्या कापण्यास सुरुवात केल्याने माथेरानकरांच्या चिंतेत अजूनच भर पडलेली आहे.
लॉकडाऊन काळातील बिलांवर सूट मिळावी या करिता माथेरानकर मागणी करीत असताना आता त्यांच्या जोडण्याचा कापावयास निघाल्याने दाद तरी कोणाकडे, मागायची असा प्रश्न माथेरानमधील जनता विचारत आहे. महावितरणाने माथेरानमधील अनेक हॉटेल व व्यावसायिकांची वीज जोडणी खंडित केली आहे तर मार्च अखेरीपर्यंत वसुलीसाठी शासनाची इतर खातीही सरसावली असून महसूल व पालिका प्रशासनही वसुलीसाठी माथेरानमध्ये फिरू लागल्याने स्थानिकांच्या चिंतेत भर पडू लागली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊनचे ढग डोक्यावर फिरत असताना आता वसुलीवाल्यांना चिंताही लागली असल्याने माथेरांकरांच्या चिंतेत अधिक भर पडू लागली आहे. आधीच कर्जाचा बोजा आलेल्या व्यापाऱ्यांनी यावर्षीच्या पर्यटन हंगामाकडे डोळे लावलेले असताना या अघोषित लॉकडाऊनमुळे घटलेल्या पर्यटन संख्येमुळे चिंतेत टाकले आहे.