माथेरान, काशीद, मांडवा, उणेगाव पर्यटक सुविधांनी होणार सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:05 AM2021-03-25T00:05:58+5:302021-03-25T00:06:15+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी होणार वितरित : आठ वर्षे रखडलेली कामे मार्गी
रायगड : पर्यटनस्थळांच्या पायाभूत विकासासाठी गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला तब्बल साडेपाच काेटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळणार आहे. यामुळे माथेरान, काशीद, मांडवा, उणेगाव पर्यटक सुविधांनी सुसज्ज होणार आहेत. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या विकासाला गती येणार असल्याचे बाेलले जाते.
पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सन २०१२-१३ ते सन २०१९-२० या कालावधीत रायगड जिल्ह्यातील मंजूर झालेल्या पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी आवश्यक उर्वरित निधी मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला हाेता. आता सरकारने सन २०२०-२१ या वर्षासाठी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे ५ कोटी ४५ लक्ष ४२ हजार निधी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
सन २०१३-१४ मध्ये मान्यता मिळालेल्या माथेरान येथील पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या २४ कोटी रुपये निधीपैकी पूर्वी २१ कोटी ४३ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित २ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनमान्यता मिळाली आहे.
सन २०१७-१८ मध्ये मान्यता मिळालेल्या मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी सुशोभीकरण करणे या कामांतर्गंत जमीन सपाटीकरणकरिता ५ हजार, जमिनीच्या पायाभरणीसाठी खोदकाम करण्यासाठी ४४ हजार रुपये, बांधकामासाठी मुरुम, ग्रॅनाईट दगड यांचा पुरवठा करणे याकरिता ३ लाख २६ हजार, इमारतीच्या पायाभरणीसाठी सिमेंट काँक्रीटीकरण करणे ५ लाख ९५ हजार, ग्रॅनाईट, दगड, वाळू यांचा पुरवठा करणे याकरिता ९ लाख ९७ हजार, रंगरंगोटी आणि कोरीव कामासाठी ग्रॅनाईट प्लेटचा पुरवठा याकरिता ८ हजार रुपये, टेस्टिंग चार्जेस फॉर मटेरीयल याकरिता ३ हजार रुपये अशा एकूण १९ लाख ९९ हजार निधीपैकी पूर्वी १० लाख निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित ९ लाख ९९ हजार इतका निधी वितरित करण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे.
सन २०१७-१८ अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे ग्रामपंचायत धोकवडे आर.सी.एफ. जेट्टीकडे जाणारा रस्ता तयार करणे, या कामांतर्गत रस्त्यासाठी मटेरियल पुरवठा याकरिता ८ लाख ७६ हजार, २० मी. मी. जाडीचा बिटूसम मुरुड (सर्व मटेरियलसहित) याकरिता ८ लाख ६० हजार रुपये, बिटूसम लिक्विड सील कोट (सर्व मटेरियलसहित) याकरिता २ लाख ५४ हजार रुपये, २५ मी. मी. जाडीचा मार्बल पुरवठा याकरिता १ हजार रुपये, संकीर्ण कामांकरिता ५ हजार रुपये अशा एकूण १९ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीपैकी १० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित ९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी
वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे. उणेगाव फाटा, गोरेगाव (ता. माणगाव) येथील गावतळ्याचे सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी तलावाचे खोलीकरण, संरक्षक भिंत, व्हिप होल्स, पदपथ, रेलिंग, बसण्याची व्यवस्था आदी याकरिता २ कोटी ५१ लाख ११ हजार रुपये, टेस्ट रिपोर्ट याकरिता १ लाख ५० हजार रुपये, बगीचा आणि कारंजे याकरिता ५ लाख रुपये, कामगारांचा विमा याकरिता दाेन लाख रुपये ५७ हजार, आकस्मिकता निधीकरिता १० लाख ३१ हजार रुपये, विद्युतीकरण (विद्युत जोडणीसह) याकरिता १० लाख रुपये, सल्लागार आणि वास्तुशास्त्रज्ञ याकरिता ५ लाख १५ हजार रुपये, जीएसटी करिता ३२ लाख ४९ हजार रुपये अशा एकूण ३ कोटी १८ लाख ४७ हजार रुपये निधी पैकी पूर्वी ५० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला होता. तर आता उर्वरित १ कोटी ८३ लाख ४७ हजार इतका निधी वितरित करण्यास सरकारने हिरवा कंदील दाखविला.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील माथेरान, काशीद, मांडवा तसेच उणेगाव येथील विविध कामांकरिता शासनाकडून एकूण २७ कोटी ५८ लाख ४२ हजार निधीपैकी पूर्वी २२ कोटी १३ लाख निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित ५ कोटी ४५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.