मुंबई / नेरळ / माथेरान : तब्बल १८ महिन्यांनंतर माथेरानची मिनी ट्रेन सोमवारी सुरू झाली. अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणाºया या मिनी ट्रेनच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासनाने खासदार श्रीरंग बारणे यांना आमंत्रित केले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बारणे उद्घाटनास येऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने गँगमन विक्रम दरोगा यांना मिनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्याची संधी दिली. त्यामुळे खासदारांची दांडी मारल्याने गँगमनला संधी मिळाल्याची चर्चा माथेरानमध्ये रंगली. विशेष म्हणजे, विक्रम दरोगा हे ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त होतील.दीड वर्षांपासून मिनी ट्रेनचा प्रवास बंद होता. अखेर रेल्वेने माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा रुळावर आणल्याने, स्थानिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी अवघ्या वीस मिनिटांत माथेरान ते अमन लॉज या फेरीचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले होते. अमन लॉज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनच्या रोज १२ फे-या होतील. बुधवार, गुरुवारी ११ फेºया असतील. या सोहळ्याला अमन लॉज स्थानकात ए. के. सिंग, (जनसंपर्क रेल्वे अधिकारी), नरेंद्र पनवार (वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक), संतोष जामघरे (सी. आर. एम. एस.) हे उपस्थित होते.जल्लोष, सेल्फी आणि मिनी ट्रेन- एनडीएम ४०० आणि ४०२ ही दोन इंजिन लावलेली मिनी ट्रेन सकाळी नेरळ येथून अमन लॉज स्थानकात पोहोचली. फुलांनी सजविलेली मिनी ट्रेन दीड वर्षानंतर पहिल्यांदाच अमन लॉज ते माथेरान या दरम्यान धावणार होती. अनेकांनी या वेळी जल्लोष करीत मिनी ट्रेनसोबत सेल्फी काढली.- मागे-पुढे इंजिन आणि मध्ये पाच प्रवासी डबे असलेल्या माथेरान राणीमधून सफर करण्यासाठी पर्यटक उत्सुक होते. पहिल्या दिवशी ९६० प्रवाशांकडून ६४,३०० रुपये एवढे उत्पन्न प्रशासनाला मिळाले आहे.माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या वतीने पहिल्या प्रवासी सेवेचे चालक सुनील मिसाळ, सुनील बोराडे, आर. डी. शर्मा आणि गार्ड सीताराम रामचंद्र यांनी सारथ्य केले. त्याबद्दल त्यांचा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी सागर घोलप आणि सत्ताधारी गटनेते प्रसाद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मध्य रेल्वेकडून मिनी ट्रेनच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. मात्र, पूर्वनियोजित बैठकीमुळे या कार्यक्रमात उपस्थित राहणे शक्य नव्हते. माथेरानकरांच्या सेवेसाठी मिनी ट्रेन लवकर सुरू करणे आवश्यक होते. त्यामुळे उद्घाटन लांबणीवर टाकू नका, अशी सूचना मी स्वत: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांना केली होती. - श्रीरंग बारणे, खासदार
माथेरान मिनी ट्रेन उद्घाटन; खासदारांनी मारली दांडी, म्हणून मिळाली गँगमनला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:59 AM