Matheran: मिनी ट्रेन लवकरच रुळावर, तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात झाले होते नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:16 PM2022-08-30T13:16:13+5:302022-08-30T13:16:40+5:30
Matheran:
मुकुंद रांजाणे
माथेरान : पर्यटकांसह माथेरान नगरीचे मुख्य आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सफारीसाठी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात.
सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे ही ट्रेन बंद झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, येत्या नोव्हेंबरपर्यंत नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली. त्यामुळे लवकरच पुन्हा मिनी ट्रेनची सफर करता येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्याच्या सततच्या मागणीनंतर या मार्गाच्या पाहणीनंतर सुरक्षिततेचे अनेक उपाय सुचवून ही ट्रेन सुरू करावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचविले होते.
त्यानुसार कामे सुरू असून त्याची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे मार्गाची पाहणी करून माथेरान स्थानकाला भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
बोगी वाढवण्याची मागणी
रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजय सावंत यांनी त्यांची भेट घेऊन नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकर सुरू व्हावी. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या शटल सेवेच्या बोगींमध्ये वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्याची तत्काळ दखल घेत लाहोटी यांनी दोन बोग्यांची वाढ करण्याची ग्वाही दिली.
सध्या माथेरानमध्ये वाढीव बोगी उपलब्ध नसल्याने नेरळ येथून
दोन नवीन बोगी आणून ही सेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक लाहोटी, विभागीय प्रबंधक सलग गोयल यांनी विविध अभियंत्यांसोबत नेरळ माथेरान मार्गाची पाहणी करतानाच अनेक सूचनाही केल्या.
रेल्वे स्लीपर बदलण्याचे काम सुरू
सुरक्षिततेच्या कारणासाठी या मार्गावरील सर्व रुळ बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून त्यानुसार येथील रेल्वे स्लीपर बदलण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम आता येथील जुम्मापट्टी स्थानकापर्यंत होत आलेले आहे.