माथेरान : माथेरान मिनिट्रेनच्या सेवेबाबत रेल्वे प्रशासनाचा नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन पाहावयास मिळतो. काहीना काही तांत्रिक कारणे पुढे करून नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवा जवळजवळ बंदच करण्यात आली आहे.
देश-विदेशातील पर्यटक माथेरानला निसर्गाचा आस्वाद घेण्याबरोबरच मिनिट्रेनच्या सफरीसाठी येतात. मात्र मिनीट्रेन बंद असल्याने सर्वांचा हिरमोड होतो. मात्र अमन लॉज ते माथेरानदरम्यान या ट्रेनची शटल सेवा सुरू असल्यामुळे तरी पर्यटकांना त्याचा आनंद घेता येतो. स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांमुळे येथील शटल सेवा तरी सुरू आहे. त्यामुळेच इथल्या स्थानिकांसह तालुक्यातील जवळपास पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. नेरळ, कर्जत त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना केवळ माथेरानच्या पर्यटनावर अवलंबून रहावे लागत आहे.
नेरळ -माथेरान मिनिट्रेन सेवा बंद असल्यामुळे नाईलाजाने पर्यटकांना खासगी वाहनाने अव्वाच्या-सव्वा रक्कम मोजून हा घाटरस्त्याचा सात किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. नेरळ - माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू झाल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.
खासगीकरणामुळे उत्तम दर्जाच्या सेवा पर्यटकांना मिळतील. तसेच स्थानिकांनाही रोजगार मिळेल. देशातील चार पर्यटन स्थळी असणा-या मिनीट्रेन तोट्यामध्ये चालत असल्याने त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला सोसावा लागतो. त्यामुळे सरकार या मिनीट्रेन भविष्यात बंद करू शकते. आपले आर्थिक गणित पर्यटनावर अवलंबून असल्याने, पर्यटनाचा खरा कणा माथेरानची मिनी ट्रेन आहे. तीच बंद झाली, तर आपल्याला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे केंद्र शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे.
कारण रेल्वेला माथेरान मिनीट्रेनमुळे दरवर्षी ८० कोटींचे नुकसान होते. अंदाजे १०० कोटींचा खर्च होऊन पर्यटनाच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत फक्त २० कोटी जमा होतात. एवढा मोठा तोटा रेल्वे प्रशासनाला होऊनसुद्धा प्रशासन रेल्वे सेवा देत आहे. त्यामुळे माथेरानची मिनीट्रेन अविरत चालू राहिल्यास वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. - प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपरिषद