माथेरानला पर्यायी मार्गाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 03:19 AM2016-03-29T03:19:11+5:302016-03-29T03:19:11+5:30
थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचे नाव घेतले जाते, माथेरान प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे, अशी माथेरानची ओळख आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्तीचे
कर्जत : थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचे नाव घेतले जाते, माथेरान प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ आहे, अशी माथेरानची ओळख आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. सुटीच्या काळात पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये फिरायला येतात. शासनाचे जाचक नियम व माथेरानमधील अपुरी जागा, सुविधांचा अभाव यामुळे माथेरान तसे अविकसितच आहे, माथेरानच्या पर्यटनात वाढ हवी असेल तर माथेरानचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे माथेरानला जाण्यासाठी पर्यायी मार्ग झाला पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
होळी सणापासून चार -पाच दिवस सुट्या लागून आल्यामुळे सर्वच पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेली. मात्र माथेरान हे पर्यटन स्थळ उंच ठिकाणी असल्याने त्याठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग आहे, माथेरानमध्ये वाहनास बंदी आहे त्यामुळे पार्किंग ठिकाणी वाहने उभी करून आत जावे लागते. पार्किंगची जागा कमी असल्याने वाहने उभी करण्यास अडचण येत आहे. माथेरानमध्ये हॉटेलची संख्या आणि राहण्याची व्यवस्था याची कमतरता असल्यामुळे तीन ते चार दिवस माथेरान प्रशासनावर व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण पडला होता. हे कमी करण्यासाठी माथेरानला पर्यायी मार्गाची गरज आहे.
१९०७ मध्ये माथेरानची मिनी ट्रेन सर आदमजी पिरबॉय यांनी चालू केली त्यानंतर खऱ्या अर्थाने माथेरान या पर्यटन स्थळाची ओळख जगभर झाली. त्यानंतर माथेरान मधील स्थानिकांनी श्रमदान करून नेरळ - माथेरान पायवाट तयार केली त्यामुळे मग पर्यटक माथेरानमध्ये पायवाटेव्दारे येऊ लागले. कालांतराने रस्ता मोठा करण्यात आला त्यावर १९७८ मध्ये टॅक्सी सेवा सुरु झाली. टॅक्सी सेवा सुरु झाल्याने माथेरानच्या पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.
पनवेल- माथेरान रस्ता व्हावा याकरिता माथेरानचे नगरसेवक दिनेश सुतार यांनी श्रमदान केले होते तर माजी नगरसेवक अरविंद शेलार यांनी हा रस्ता व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न केला होता. माथेरानमधील अनेकांनी प्रयत्न केले. या रस्त्याचा सर्व्हे झाल्याचे समजते मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे हा रस्ता अद्याप बाकी आहे. (वार्ताहर)
व्यवसायावर परिणाम
दस्तुरी नाक्यावर पार्किंगची अपुरी व्यवस्था, माथेरान घाटात वाहतुकीची कोंडी त्यामुळे अनेक पर्यटकांना माघारी फिरावे लागते त्याचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होत असून माथेरान साठी दुसरा पर्यायी मार्ग असावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. धोधानी - माथेरान हा पाच किलोमीटरचा रस्ता शासनाने विकसित केल्यास पर्यटकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. तसेच चौक मार्गे रामबाग पाइंट पर्यंतचा रस्ता विकसित केल्यास हाही मार्ग लाभदायक ठरु शकतो.