माथेरान : सन २०२० हे कोरोना पर्व असल्याने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. नुकताच २ सप्टेंबरला सर्वत्र अनलॉक केल्यामुळे भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून अत्यंत कठीण परिस्थितीत घरातच कोरोनाकाळ घालवून अखेरीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच्या निसर्गरम्य थंड हवेच्या माथेरान या पर्यटनस्थळाला पसंती दिली आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर आकर्षक विद्युत रोशणाई त्याचप्रमाणे नाताळनिमित्ताने बच्चेकंपनीच्या लाडक्या सांताक्लॉजचे चलचित्र खऱ्याखुऱ्या रूपाने स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.माथेरानच्या आजवरच्या एकंदरीत राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी अद्याप कधीच अशा प्रकारे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. परंतु मागील चार वर्षांपासून येथे काही ना काही बदल हमखास पाहावयास मिळत आहेत. विविध ठिकाणी मेरी ख्रिसमस तसेच हॅप्पी न्यू ईअरच्या पताका झळकत आहेत. त्यामुळे पर्यटकांनासुद्धा या अभूतपूर्व स्वागत सोहळ्याने आनंद होत आहे.
आकर्षक सजावट या वर्षी पहिल्यांदाच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि पर्यटकांना माथेरानकडे आकर्षित करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून गटनेते प्रसाद सावंत यांनी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या सहकार्याने सांताक्लॉजचे एक अलौकिक स्वागतदृश्य उभारले आहे. विविध ठिकाणी मेरी ख्रिसमस तसेच हॅप्पी न्यू ईअरच्या पताका झळकत आहेत. आकर्षक सजावट केली आहे.