माथेरानमध्ये विक्रमी पावसाने वाताहत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:53 PM2019-09-17T23:53:30+5:302019-09-17T23:54:25+5:30
‘माथ्यावरील रान’ अशी बिरुदावली असलेले माथेरान हे रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आहे.
- कांता हाबळे
नेरळ : ‘माथ्यावरील रान’ अशी बिरुदावली असलेले माथेरान हे रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आहे. डोंगर माथ्यावर उंच हिरवीगार घनदाट वनराई असल्यामुळे येथे प्रतिवर्षी जोरदार पाऊस बरसतो. मात्र, या वर्षी वरुणराजाने माथेरानकरांवर जास्तच मेहरबानी केली. २७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल सात हजार ७१ मिलीमीटरपर्यंत मजल मारली आहे. मागील ३१ वर्षांत इतका पाऊस कधीच बरसला नव्हता. या पावसामुळे माथेरानची पूर्ण वाताहत झाली आहे.
मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे प्रदूषणमुक्त असे हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथे जोरदार पाऊस पडणे स्वाभाविक आहे. मात्र, यावर्षी अधिक पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे पर्यटक संख्या कमी झाली, मिनीट्रेन बंद पडली, सण भरपावसामध्ये साजरे केले, जमिनीची धूप जास्त प्रमाणात झाली, येथील रस्त्याची दुरवस्था झाली, यामुळे माथेरानकर त्रस्त झाले आहेत.
२७ जुलै रोजी मुसळधार पडलेल्या पावसामुळे घाटात रेल्वेरूळ मार्गावर पडलेल्या दरडी, तसेच काही ठिकाणची रुळाखालील जमीन वाहून गेल्याने नेरळ-माथेरान मिनीट्रेन एका वर्षाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला, तसेच अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा सुरक्षा कारणास्तव बंद ठेवली. सतत जलधारा बरसत असल्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून पाणी जात आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्याने निसर्गाचीही हानी होत आहे. जमिनीची धूप होऊन झाडे उन्मळून पडत आहेत. गटाराचे तोंड छोटे असल्याने पाणी रस्त्यावरून वाहून गेल्याने ठिकठिकाणी रस्त्याला चर पडले आहेत.
माथेरानला इतका पाऊस पडण्याची पहिलीच वेळ असल्याचे ज्येष्ठ नागरिकांकडून बोलले जात आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली होती तेव्हा सर्व नागरिक चिंतेत होते. मात्र, जून महिन्याच्या अखेरीपासून बरसणाºया पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
सर्वाधिक पाऊस पडणारे माथेरान राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर
२६३६ फिट म्हणजे ८०३ मीटर उंचीवर माथेरान शहर वसलेले आहे, त्यामुळे उंचावर असल्यामुळे साहजिकच येथे चांगला पाऊस होतो. मात्र, या वर्षी असा काही जोर धरला आहे की मागील ३१ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या रेकॉर्डनुसार १६ आॅक्टोबर २००५ मध्ये ६४३६ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. तो विक्रम मोडीत काढत या वर्षी १५ सप्टेंबर रोजी ७०७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे, त्या खालोखाल माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात माथेरान हे क्रमांक दोनचे सर्वाधिक पाऊस पडणारे शहर बनले आहे.
>नगरपालिकेसमोर मोठे आव्हान
१जोरदार पडलेल्या पावसामुळे संपूर्ण माथेरानमधील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पर्यटनस्थळाकडे जाणाºया रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. हे रस्ते बनविण्यासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता आहे. ‘क’ वर्गाची नगरपालिका असल्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने या रस्त्यासाठी निधी उभा करण्याचे मोठे आव्हान नगरपालिकेसमोर आहे.
>पर्यटक संख्या रोडावली
२सतत बरसत असलेल्या पावसामुळे मिनीट्रेन बंद असल्यामुळे दोन किलोमीटर पायी चालत प्रवास करून ये-जा करावी लागते. पर्यायी व्यवस्था नसल्याने पर्यटकांचे हाल होतात, तसेच मुंबई-पुण्याकडे जाण्याकरिता लोकल ट्रेन व एक्स्प्रेस गाड्या रद्द होतात. परिणामी, पर्यटकांना खासगी वाहन करून इच्छित स्थळी जावे लागते. जून महिन्यापासून १५ सप्टेंबर या चार महिन्यांत फक्त एक लाख ७० हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते.
>पावसामध्ये सण साजरे
३दरवर्षी श्रावण महिना संपल्यावर पावसाचे प्रमाण कमी होते; पण या वर्षी पावसाने थोडीही विश्रांती घेतली नसून सर्व सण हे पावसातच साजरे करावे लागले. मिनीट्रेन बंद असल्यामुळे गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन पावसात कोणाला दोन किलोमीटर चालावे लागले तर कोणाला पाच किलोमीटर चालावे लागले.
>माथेरानमध्ये सात हजारांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे ही माथेरानसाठी अभिमानाची बाब आहे. इतका पाऊस होऊन हे पाणी इथेच अडवून माथेरानमध्येच कशा प्रकारे जिरवता येईल ही संकल्पना अमलात आणण्यासाठी या पावसात बोध घेतला आहे आणि पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी पालिकेमार्फ त पावले उचलणार आहोत.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी
माथेरानमध्ये जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. या पूर्वी असा पाऊस कधीही बरसला नव्हता. रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे, ते बनविणे नगरपालिकेसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी ठरावही केले आहेत, आता सरकारदरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून त्यातून अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे ते बनवून घेणार आहोत.
- प्रसाद सावंत, बांधकाम सभापती
>माथेरानमध्ये तीन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे हातरिक्षाचालक पुरते हैराण झाले आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. रस्त्याचे पूर्ण गटार झाले आहे, त्यामुळे हातरिक्षा कशी खेचायची हा प्रश्न उभा ठाकला आहे.
- दीपक डोईफोडे,
हातरिक्षाचालक
>माथेरानमध्ये याअगोदर इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच पाऊस झाला नव्हता. कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसे पाहायला गेले तर माथेरानकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यात दुसºया क्रमांकाचे अधिक पाऊस पडण्याचे शहर बनले आहे, ही गौरवशाली बाब आहे.
- अरविंद शेलार,
ज्येष्ठ नागरिक