माथेरान : दरवर्षी पावसाळ्यात मातीच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर धूप होत असताना त्याचप्रमाणे घोड्यांच्या तसेच सततच्या रहदारीमुळे रस्त्यांची झिज होत आहे. यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
माथेरानची खरी ओळख ही तांबड्या मातीचे रस्ते, हीच जरी असली तरीसुद्धा वाढती लोकसंख्या तसेच पर्यटनवाढीमुळे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते, त्यामुळे रस्त्याची वाताहात झाली आहे. त्यामुळे नेहमीच या रस्त्यांची डागडुजी करताना नगरपरिषदेच्या तिजोरीवर आर्थिकदृष्ट्या भार पडत होता. सध्या मागील काळातील अर्थातच २०१५ मधील क्ले पेव्हर ब्लॉकची अपूर्ण कामे नगरपरिषदेने युद्धपातळीवर सुरू केली आहेत. वाहतुकीच्या गहण समस्येमुळे रस्त्यांसाठी लागणारे सामान आणताना ठेकदाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
काही वर्षांपूर्वी येथील पिसारनाथ मार्केट आणि भाई कोतवाल शॉपिंग सेंटर येथे अशाच प्रकारे क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते.चिपळूण येथून क्ले पेव्हर ब्लॉक आणून त्या रस्त्यावर नेट अंथरून त्यावर ग्रीट, सिमेंट, रेती वापरून हे रस्ते दीर्घकाळ टिकतील, अशाच प्रकारे प्रयोजन केले आहे. या रस्त्यावर घोडे आणि अन्य अवजड वाहतूक केल्यास काही नुकसान होत नाही. अशा उत्तम दर्जाचे हे क्ले पेव्हर ब्लॉक नगरपरिषद बसवीत आहे. त्यामुळे आगामी काळात येथील धुळीचे प्रमाण कमी होईल.
दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांच्या मालाचे घोड्याच्या सततच्या रहदारीमुळे उडणाऱ्या धुळीने नुकसान होणार नाही. पुढील काही महिन्यांत एमएमआरडीएमार्फत दस्तुरी नाका ते पांडे रोडपर्यंत अशाचप्रकारे क्ले पेव्हर ब्लॉक रस्ते विकसित करण्यात येणार आहेत, त्यामुळे माथेरानमध्ये, प्रदूषणमुक्त वाहने चालविण्यासाठी काहीच अडचणी निर्माण होणार नाहीत.