माथेरानचा बंद यशस्वी
By admin | Published: January 31, 2017 03:38 AM2017-01-31T03:38:31+5:302017-01-31T03:38:31+5:30
येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून
माथेरान : येथील माथेरान बचाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने हरित लवादाने २००३ ची बांधकामे हटविण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारून या निर्णयाविरोधात आपली आक्र मकता दाखवली. परंतु माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने या बंदमध्ये पर्यटकांचे अतोनात हाल झाले.
फेब्रुवारी २००३ मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले त्यानुसार माथेरानमध्ये बांधकामांना परवानगी दिली जात नाही याचा आधार घेत मुंबई स्थित बॉम्बे एन्वायरमेंट अॅक्शन ग्रुपने एप्रिल २०१६ मध्ये बांधकामाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका स्थानिकांविरोधात न करता शासन आणि अधिकारी यांच्याविरोधात केल्यामुळे याबाबत स्थानिकांना काहीच माहिती नसल्याचे संघर्ष समितीने सांगितले. तसेच २००३ नंतर जितकी बांधकामे झाली आहेत ती त्वरित हटवून तसा अहवाल हरित लवादास सादर करावा असा आदेश दिल्याने अधिकारी वर्गाने बांधकामे हटविण्यासाठी तयारी केली आहे. ॅयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथेरान संघर्ष समितीने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. या बंदला सर्व हॉटेलधारक, लॉजधारक, दुकानदार, घोडेवाले, रिक्षावाले, टॅक्सी चालक-मालक संघटनेने पाठिंबा दर्शवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. परंतु पर्यटकांचे अतोनात हाल झाले.
न्यायालयात घ्यावी लागणार धाव
याबाबतीत सर्वच नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन यातून काहीतरी सुवर्णमध्य काढावा असे सूचित केले. परंतु शासनाचा आदेश आम्हाला तसेच पोलीस खात्याला पाळणे बंधनकारक असल्याचे अधीक्षक संतोष शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माथेरानकरांना आगामी कारवाई टाळण्यासाठी स्थगिती आणण्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या सहीनिशी मुख्यमंत्री फडणवीस यांना कारवाई थांबविण्यासाठी निवेदन देऊन मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. एकंदरीतच सर्वच दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
बॉम्बे एन्वायरमेंट ग्रुपने हरित लवादात याचिका दाखल करून न्यायालयाने जी २००३ ची बांधकामे हटविण्याचा निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी अतिशय दु:खद निर्णय आहे. आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.
- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा
अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मूलभूत अधिकार असताना हे पर्यावरणवादी आमचा अधिकार हिरावू पाहत आहेत. येथील स्थानिक भूमिपुत्रच पर्यावरण अबाधित राखत आलेला आहे. परंतु हे पर्यावरणवादी पर्यावरण वाचविण्यासाठी एक झाड सुद्धा माथेरानमध्ये लावत नाहीत यामुळे त्यांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नाही, यांना जर पर्यावरणाची एवढी काळजी आहे तर मुंबईमधील प्रदूषण कमी करा.
- प्रसाद सावंत,
सर्वपक्षीय संघर्ष समिती