लोकमत न्यूज नेटवर्क माथेरान : माथेरान पर्यटन नगरी हळूहळू कात टाकत असून एमएमआरडीएने उपलब्ध करून दिलेल्या भरीव निधीमुळे माथेरानमध्ये विविध विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वास येताच एक नवीन माथेरान पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे.
माथेरानच्या पर्यटन विकासासाठी माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रयत्नातून येथील विविध प्रेक्षणीय स्थळांचे सुशोभीकरण, नेरळ माथेरान घाटरस्ता मजबुतीकरण येथील पार्किंगचे सुशोभीकरण याकरिता भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. तो नगरपालिकेकडे वर्ग झाल्यानंतर येथे युद्धस्तरावर सुशोभीकरणाची कामे सुरू झाली होती. त्यामध्ये नेरळ माथेरान घाट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहनस्थळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील विविध प्रेक्षणीय स्थळांचे कामही जोरात सुरू आहे. त्यातील इको पॉइंट, हार्ट पॉइंट, मायरा पॉइंट व पॅनोरमा पॉइंट ही कामे जवळजवळ पूर्ण होत आली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच माथेरानमधील हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलाच्या सुशोभीकरण व विविध प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. आता हा निधी पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर येथील कामे युद्धस्तरावर सुरू झाली आहेत. त्यातील क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आहे तर सात पॉइंट सर्कलमधील विविध ठिकाणी धूळविरहित रस्ते व सुशोभीकरण कामे जोरदार सुरू आहेत. माथेरानच्या पर्यटन दृष्टिकोनातून स्वतःचे ॲप विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणारी पहिली नगरपालिका होण्याचा मान माथेरान पालिकेने मिळविला असून त्यास पर्यटकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. माथेरानमधील सर्वात उंचीवर असलेला सूर्योदयासाठी प्रसिद्ध असा पॅनोरमा पॉइंट अतिवृष्टीमध्ये विस्मृतीत गेला होता.
या ठिकाणी सुशोभीकरणाने हा पॉइंट पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक झाला असून क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते होणार असल्याने येथील सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. माथेरानमध्ये दरवर्षी जोरदार पाऊस पडतो व येथील पाणी डोंगररांगांमुळे माथेरानच्या खाली वाहून जाते. येथे स्थानिकांना पाणी पिण्यासाठी वापरात येणारा शार्लेट तलाव हा एकमेव तलाव आहे जो पालिकेच्या मालकीचा आहे. आता पालिकेच्या मार्फत पाणीसाठवणीमध्ये वाढ होण्यासंदर्भात प्रकल्प उभे केले जाणार आहेत. परिसर सुशोभीकरण व येथील पाण्यावर बंद बाटलीतील शुद्ध पाणी विक्री प्रकल्पही विचाराधीन असून त्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
माथेरान परिसरात सध्या सुरू असलेल्या कामांमुळे येथील डोकेदुखी असलेला रस्त्यांचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनवाढीस चालना मिळण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.